इचलकरंजी येथे उघडय़ावर शौचास जाणाऱ्या १५ जणांवर गुड माॅर्निंग पथकाने गुरुवारी कारवाई करत या सर्वाना हलगीच्या निनादात मिरवणूक काढून भागात फिरवण्यात आले. या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले.
इचलकरंजी शहर पाणंदमुक्त करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. पे अ‍ॅण्ड युज शौचालय, शौचालय बांधकामासाठी अनुदान, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करण्यात येत आहे. तरीही शहरात अनेक ठिकाणी नागरिक उघडय़ावर शौचास बसताना दिसतात. यामध्ये कारखान्यातील कामगारांचा समावेश आहे. शहर स्वच्छतेच्या उद्देशानं पालिकेनं वॉर्डनिहाय गुड माॅर्निंग पथकं नियुक्त केली आहेत.
या अंतर्गत आज अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकानं जवाहरनगर, कलानगर, प्रांताधिकारी कार्यालय परिसर यासह विविध ७ ठिकाणी पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत पाहणी केली. पथकाकडून १५ जणांना पकडण्यात आले. विशेष म्हणजे या सर्वाची हलगीच्या निनादात भागातून मिरवणूक काढली. तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.
कारखानदारांवर कारवाई
उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांविरोधातही मोहीम दररोज चालणार असून ज्या कारखान्यात शौचालय नाही, अथवा असलेल्या शौचालयाचा वापर केला जात नाही त्याची पाहणी करून सदर कारखानदारांवर कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले.
कारवाईत सातत्याची मागणी
नगरपालिका प्रशासनाने उघडय़ावर शौचास बसणाऱ्या विरोधात उचललेल्या कारवाईचे शहर वासीयांकडून स्वागत केले जात असतानाच ही कारवाई केवळ दिखाऊ ठरू नये, अशी प्रतिक्रियाही समाज माध्यमांतून उमटत आहे. नगरपालिका इमारती, पालिकेचे रुग्णालय, पोलिस ठाणे, प्रांत कार्यालय, विश्रामगृह अशा अनेक शासकीय कार्यालयाभोवतीच भरदिवसाही लोक शौचास बसत असतात हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार या सदरात मोडत असल्याने वरवरची कारवाई न होता त्यात सातत्य व गांभीर्य दिसावे, अशी मागणी होत आहे.