केंद्र व राज्य शासन जनतेसाठी राबवित असलेल्या अनेकविध विकास व कल्याणकारी योजना लाभार्थीपर्यंत थेट आणि प्रभावीपणे पोहोचविण्यात शासकीय यंत्रणांनी सक्रिय व्हावे. या कामी नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनीही भरीव योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
केंद्र शासनाचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गडिहग्लज येथे आयोजित केलेल्या लोक माहिती अभियान आणि महा राजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनेचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
शासनाने राज्यातील ६५ टोल नाक्यांवर छोटय़ा वाहनांना टोलमुक्त केले असून, कोल्हापूरचा टोलप्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्नही राज्य शासन प्राधान्यक्रमाने हाताळत असून, येत्या वर्षभरात हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याबरोबरच राज्यातील रस्ते विकासावरही केंद्र आणि राज्य शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले असून, सातारा-कागल हा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे ते म्हणाले.
केंद्र शासनाने सामान्य माणसांसाठी सुरू केलेल्या विविध विमा योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, कौशल्य विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात सर्वानीच सक्रिय व्हावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी म्हणाले, महा राजस्व अभियानातून लोकांना विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांना लागणारे दाखले, प्रमाणपत्रे, आधार कार्ड अशा विविध बाबी जागेवरच उपलब्ध करून दिल्या जात आहेत.