ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या सोडविण्यात येतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्चमध्ये अधिवेशनात सविस्तर ज्येष्ठ नागरिक धोरण आणण्यात शासन बांधील असून तसे धोरण आणू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली.
ज्येष्ठ नागरिक चळवळीतील उत्कृष्ट कार्यासाठी भारत सरकारच्या वतीने प्राचार्य य. ना. कदम यांना वयोश्रेष्ठ सन्मान राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारानिमित्त प्राचार्य य. ना. कदम यांचा नागरी सत्कार येथील शाहू स्मारक भवनामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला त्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात अनुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्चच्या अधिवेशनामध्ये सविस्तर ज्येष्ठ नागरिक धोरण आणले जाईल, यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाईल असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या धोरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे वय, आरोग्य, सवलतींचा औषधोपचार, दवाखान्याचा खर्च, विरंगुळा केंद्र अशा अनेकविध सुविधांचा अभ्यास करून त्यांचा या धोरणामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न आहे.
राज्य शासनाने शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या तीन प्रमुख घटकांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले असून, गावागावात पाणीसाठे निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सोळाशे कोटी रुपये खर्च करून ६ हजार ५०० गावांना लाभ दिला आहे. यामध्ये ३०० कोटीचा लोकसहभाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी ५ वर्षांत राज्यातील ३१ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना प्रख्यात अनुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य़ व्हावे, यासाठी प्राचार्य य. ना. कदम यांनी घेतलेला पुढाकार आणि केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळेच त्यांना वयोश्रेष्ठ सन्मान हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत आर. के. जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले. प्राचार्य डॉ. माणिकराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. शेवटी प्रा. सुधाकर मानकर यांनी आभार मानले.