शिवसेनेने अधिष्ठात्यांना धारेवर धरले

कोल्हापूर : सरकारी रुग्णालयात पुरेशा औषधांचा साठा असल्याचा दावा वारंवार केला जात असला तरी येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या (सीपीआर) आवारातील सरकारी औषध खासगी औषध विक्री दुकानातून विक्री केली जात असून त्याला रुग्णालय यंत्रणेचे पाठबळ असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेनेने मंगळवारी राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांच्यावर या मुद्दय़ावरून प्रश्नांची सरबत्ती करून भंडावून सोडले. डॉ. लोकरे यांचा खुलासा असमाधानकारक ठरवून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी संबंधित औषध विक्री दुकानावर तातडीने पोलिसांत गुन्हे नोंदवा, असा इशारा दिला.

सरकारी रुग्णालयाच्या गैरसुविधांचा फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसत असतो. रुग्णालयात मुबलक औषधे असल्याचे सांगितले जात असताना बाहेरून औषध आणायला भाग पडून रुग्णाचा खिसा कापला जातो, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर आज सीपीआर व शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील कारभाराबाबत शिवसेनेच्यावतीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, आदी उपस्थित होते.

‘औषधांची टंचाई आहे म्हणून मदत मागता, मग गोरगरिबांसाठी सरकारने उपलब्ध केलेली ‘बा विक्रीसाठी नसलेली’असा शेरा असलेली औषधे सीपीआर आवारातील ‘जीवनधारा’ या खासगी मेडिकल दुकानातून विक्री कशी झाली’? असा प्रश्न संजय पवार यांनी अधिष्ठाता डॉ. लोकरे यांना विचारला. विविध मुद्दे उपस्थित केले पण लोकरे यांना योग्य उत्तर देता आले नाही. खासगी औषध दुकान ‘सीपीआर’ मालकीच्या गाळ्यात असल्याने अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी असल्याचे पवार यांनी सुनावले. संबंधित जीवनधारा मेडिकल दुकानमालकावर तातडीने गुन्हे नोंदवा अन्यथा दोन दिवसांत शिवसेना स्टाईलने आंदोलन करणे भाग पडेल, असा इशारा दिला.

व्हेंटिलेटरअभावी रुग्णांची  वाताहत होत असल्याने जाब विचारला असता लोकरे यांनी शासनाच्या हापकिन कंपनीकडे व्हेंटिलेटरबाबत मागणी  नोंदविली असल्याचा  खुलासा केला. त्यावर ‘माणसे आयुष्यातून उठल्यावर व्हेंटिलेटर येऊन काय उपयोग, असा प्रश्न विचारून पवार यांनी हापकिनकडे किती पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला, याचीही माहिती द्या, असे खडसावले.