कोल्हापूर : इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात आवश्यक सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे सुविधांमधील त्रुटी जाहीरपणे मांडून रुग्णालयाची बदनामी थांबवावी, असे जाहीर आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले.

इचलकरंजी शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री पाटील यांनी आयजीएम रुग्णालयास भेट देऊन व्यवस्थापनाकडून माहिती घेत आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या. तर बैठकीत अतिदक्षता विभागातील सुविधांवरून लोकप्रतिनिधींमध्ये आरोप—प्रत्यारोपामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला होता. त्यानंतर मंत्री पाटील यांची प्रांतकार्यालयात आढावा बैठक झाली.

मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आयजीएम रुग्णालयात १०० खाटा  वाढविण्यासह आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच प्रतीजन तपासणीसाठी खाजगी रुग्णालयांनाही परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.