इतके दिवस सराफांचा प्रश्न गाजतो आहे. त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन देवाण-घेवाण करून त्यांचा प्रश्न सरकारने सोडवावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कागल येथे एका कार्यक्रमात  बोलताना केले. तर, विमानतळावर सराफ संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता आंदोलनासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी येथे दिले.
या संदर्भात भरत ओसवाल यांनी सांगितले, की शिष्टमंडळाने ठाकरे यांची भेट घेतली.  येत्या सोमवारी-मंगळवारी व्यापक शिष्टमंडळाबरोबर आपण मुंबईत एक बठक घेऊन पंतप्रधान मोदी यांच्याकडून अबकारी कराचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.
या वेळी राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, प्रकाश आबिटकर या शिवसेनेच्या आमदारांबरोबर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनीही अबकारी करामुळे जिल्ह्यातील छोटय़ा छोटय़ा कारागिरांची आज कशी आर्थिक स्थिती खालावली आहे, त्याचे विदारक सत्य ठाकरे यांच्यासमोर मांडले. लवकर हा प्रश्न सोडवा, अशी मागणी केली. त्या अनुषंगाने ठाकरे यांनीही लवकरात लवकर बठकीला तुम्ही मुंबईला या, असा निरोपही शिष्टमंडळाला दिला.