13 December 2019

News Flash

पानसरे हत्या प्रकरण : अमित डेगवेकर याच्या पोलीस कोठडीत वाढ

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने १५  जानेवारीला बंगळुरू कारागृहातून ताब्यात घेतले होते.

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे

कोल्हापूर : कामगार नेते  गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी संशयित आरोपी अमित डेगवेकर याच्या पोलीस कोठडीत  सहा दिवसांची वाढ करण्यात आली. त्याला २८  जानेवारीपर्यंत कोठडीत ठेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अमित डेगवेकर याला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने १५  जानेवारीला बंगळुरू कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्याच्या नऊ  दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. राऊळ  यांच्यासमोर हजर केले. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवाद विशेष सरकारी वकील  अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी केला.

त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, या हत्या प्रकरणातील  दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याने राजेश बंगेरा याच्या मार्गदर्शनाखाली किणये बेळगाव येथे बॉम्बस्फोट प्रशिक्षण झाल्यानंतर बेळगाव  येथे १३ ते १५ जणांच्या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचे सांगितले होते . तसेच पाचवा संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीत असलेल्या काही सांकेतिक भाषेचा  खुलासा तपासादरम्यान त्याने सांगितले आहे.  त्यानुसार २.५ म्हणजे धर्मद्रोही व्यक्तीना नुकसान पोहचविणे.  विरोधी काम करणाऱ्या व्यक्तींना नुकसान पोहोचवणे. प्रतिष्ठित व्यक्तींचा सर्वनाश करणे, तसेच अशा कृत्यांना ‘इव्हेंट’ असे सांकेतिक शब्द ते वापरत असल्याचे मान्य केले आहे . पानसरे यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावरील तसेच घराच्या परिसरातील ‘सीसीटीव्ही’ची  पाहणी करण्याची जबाबदारी माझ्यावर  होती, अशी कबुली त्याने ९ दिवसाच्या पोलीस कोठडी वेळी दिली असल्याचेही न्यायालयात  राणे यांनी  सांगितले.

शस्त्र प्रशिक्षणानंतर शस्त्रे कोठे नेली. या शस्त्रांचा  कशासाठी वापर झाला. याची माहिती डेगवेकरला असल्याने त्याच्या सखोल चौकशीसाठी सहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी राणे यांनी केली.

तर सशयितांच्या वतीने अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी युक्तिवाद केला. ते  म्हणाले यापूर्वी कोल्हापूर एसआयटीने अमोल काळे व वीरेंद्र तावडेला ताब्यात घेतले होते.  त्या वेळी या बाबी का समोर आल्या नाहीत.  २०१३ —१४ मध्ये बैठक, रेकी झाली असे  पोलीस सांगत आहेत. मग डॉ. तावडे, अमोल काळे यांच्या पोलीस कोठडीत पोलिसांना ही माहिती का मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित करून कोल्हापूर एसआयटी  फक्त बंगलोर एसआयटीने केलेला तपास ‘कॉपीपेस्ट’ करत आहे. कोठडीसाठी बालिश कारणे दिली जात असल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर राऊ ळ यांनी अमितला  २८  जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

First Published on January 24, 2019 2:37 am

Web Title: govind pansare murde amit degwekar police custody extended till jan 28
Just Now!
X