पानसरे हत्या प्रकरण, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

कोल्हापूर : कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे याने न्यायाधीशांसमोर तपास अधिकाऱ्यांच्या विरोधात  केलेले आरोप गंभीर असल्याने त्याच्या चौकशीची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने गुरुवारी अपर जिल्हाधिकारी कुमार काटकर यांची भेट घेऊ न निवेदनाद्वारे करण्यात आली.

खटला संपवण्यासाठी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी आपल्याला ५० लाख रुपये देऊ  केल्याचा आरोप अंदुरे याने केला होता. हे पैसे घेऊन गुन्ह्य़ाची कबुली दे असा दबाव आपल्यावर आणला जात असल्याचा आरोपही त्याने केला होता. यावरून  कुटुंबीयांना ते मानसिक त्रास देत आहेत असा गंभीर आरोप अंदुरेने केला आहे. अशाप्रकारे संशयितांना गुन्हा स्वीकृतीसाठी वारंवार धमकी दिली जाणे, हे संशयितांच्या मानवाधिकाराचे हनन आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना खऱ्या खुन्यापर्यंत पोहोचायचे असेल, तर पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास हा तपास अधिकारी अमृत देशमुख यांच्याकडून काढून अन्य अधिकाऱ्यांकडे द्यावा, तसेच आरोपींना ५० लाख रुपयांची लाच का देऊ  केली? हे पैसे कोणे पुरवणार होते? या मागे कोण आहे? याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काटकर यांना दिलेल्या  निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष अशोक रामचंदानी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शरद माळी, शिवसेनेचे रामभाऊ  मेथे, अधिवक्ता अमोल रणसिंग, डॉ. आनंदे उपस्थित होते.