कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या चार संशयितांविरोधात सोमवारी (दि. ११) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याआधी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल आहे. एसआयटीकडून ४०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आतापर्यंत ८ संशयित आरोपींची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने आठ संशयितांपैकी पहिला संशयित समीर गायकवाड, दुसरा संशयित वीरेंद्र तावडे यांच्याविरोधात याआधी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तिसरा संशयित सारंग अकोलकर व चौथा संशयित विनय पवार यांना फरारी घोषित केले आहे.

एसआयटीने १५ नोव्हेंबरला अमोल काळे याला तर १ डिसेंबरला वासुदेव सूर्यवंशी व भरत कुरणे यांचा ताबा घेतला होता. त्यानंतर १५ जानेवारीला अमित डेगवेकर या संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. पाचवा संशयित अमोल काळे याच्या ताब्याला मंगळवारी ९० दिवस पूर्ण होत आहेत. त्या पूर्वी त्याच्या विरोधातील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे आवश्‍यक होते.