गेली दोन महिने कॉ. गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी हवा असणारा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे अखेर शुक्रवारी विशेष तपास पथकाच्या  (एसआयटी ) ताब्यात आला. त्याचा रीतसर ताबा मिळवून हे पथक रात्री कोल्हापुरात येणार असून उद्या शनिवारी त्याला येथील न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)  ताब्यात घेण्यासासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते . वीरेंद्र तावडे हा ८ वर्ष कोल्हापूरमध्ये राहिलेला आहे. त्याने रिव्हॉल्व्हर बनवून देण्यासाठी आग्रह केल्याचा जबाब कोल्हापूरमधील एका साक्षीदाराने दिलेला होता. त्या पाश्र्वभूमीवर एसआयटीने त्याचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता. तो मंजूरदेखील करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत एसआयटी तावडेचा ताबा घेऊ शकली नव्हती. त्यासाठी गुरुवारी पथक पुण्याला रवाना झाले होते. शुक्रवारी येरवडा कारागृहात  आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याचा पथकाने ताबा घेतला. आता त्याच्या बाबतीत न्यायालयात काय घडते, हे लक्षवेधी ठरले आहे.