दयानंद लिपारे

सार्वत्रिक निवडणुका म्हटल्या की आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडतातच. तथापि, पदवीधर, शिक्षक अशा सुशिक्षित, सजग मतदारांसमोर जातानाही राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या ग्राम्य, शिवराळ भाषेमुळे प्रचाराची पातळी घसरू लागली आहे. या चिखलफेकीत पदवीधर, शिक्षक यांच्या समस्या मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात १ डिसेंबरला मतदान होत आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची महाविकास आघाडी यांच्यात दोन्ही मतदारसंघांत प्रामुख्याने सामना होत आहे. अपक्ष, बंडखोर यांनी आव्हान उभे केले असले तरी त्यांच्या मर्यादाही स्पष्ट आहेत. अशा वेळी या निवडणुकीमध्ये शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची चर्चा प्राधान्याने होणे अपेक्षित आहे.

 मूळ प्रश्नांना बगल

करोना टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक पदवीधरांना रोजगार गमवावा लागला. आधीच जागतिकीकरणानंतर सुशिक्षित वर्गासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तरुणांच्या नोकऱ्या, रोजगार-धंद्याचे प्रश्न इत्यादी अनेक मुद्दे आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांची तर लांबलचक मालिकाच उभी आहे. हे सर्व प्रश्न गंभीर बनले आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील मतदार हा सुशिक्षित आहे. सामान्य, अशिक्षित मतदारापेक्षा या वर्गाचा बौद्धिक दर्जाही उच्च मानला जातो. अशा मतदारांसमोर प्रचार करीत असताना भाषेचे भान ठेवणे अपेक्षित आहे. शिवाय त्यांच्या प्रश्नाला योग्यरीत्या वाचा फोडणेही गरजेचे आहे. प्रत्यक्षात पुणे मतदारसंघांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिखलफेक ही सजग मतदारांना चिंता वाटायला लावणारी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह बहुतेक प्रमुख नेत्यांनी खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी सुरू केल्याने प्रचाराची रया निघून गेली असून त्याला उथळ, सवंग स्वरूप प्राप्त झाले आहे.

सभ्य राजकारणाला तिलांजली

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही ‘टरबुज्या’ म्हटले नाही, पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. पण त्याचा त्यांनी राग मानून घेऊ नये,’ असे विधान प्रचारादरम्यान केले. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘उद्या जयंत पाटील यांचा ‘जपा’, शरद पवार यांचा ‘शप’ किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘उठा’ असा उल्लेख व्हायला लागला, तर ते शब्दप्रयोग राज्याच्या सुसंस्कृत राजकारणात बसणारे नाहीत, त्यामुळे ते टाळले पाहिजेत,’ असे सुनावले. सुसंस्कृत राजकारणाची भाषा करत असताना चंद्रकांत पाटील आघाडीचे पदवीधरमधील उमेदवार अरुण लाड यांच्या वयावर घसरले. ‘सत्तरीतील लाड हे पाच जिल्ह्य़ांचा मतदारसंघ कसा फिरणार आणि कसा सांभाळणार,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

परंतु भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे या वयोवृद्धांना उमेदवारी दिली होती याचा त्यांना विसर पडला का, असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सभ्य राजकारणाची अपेक्षा करताना वाचाळवीर म्हणून ओळखले जाणारे भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी ‘‘चार खासदार असलेले शरद पवार हे लोकनेते कसे बनू शकतात’’ असा प्रश्न उपस्थित केल्यावर ते राष्ट्रवादीच्या टोकदार टीकेचे धनी ठरले. या शाब्दिक वादात सभ्य राजकारणाचा मुद्दा हवेत विरून गेला.

भाजपच्या नेत्यांमुळे प्रचाराचा दर्जा घसरत असताना महाविकास आघाडी भाजपच्या उमेदवारापेक्षा चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य करीत आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तर, ‘‘प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खुळ्यासारखे बडबडत आहेत’’ असे वक्तव्य केले. अशातच धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी ‘‘चंद्रकांत पाटील यांना लाजलज्जा उरली आहे का?’’ असा सवाल उपस्थित करीत आपल्या टीकेचा दर्जा दाखवला.

व्यासंग हरवला!

* विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असल्याने तेथे निवडून दिला जाणारा उमेदवार अधिक प्रगल्भ मानला जातो. त्याला निवडून देण्याची गरज काय, याची गंभीरपणे कारणमीमांसा झाली पाहिजे.

* पण सध्या प्रचारादरम्यान सत्तारूढ आणि विरोधक अपशब्दांच्या फैरी झाडत आहेत. या मतदारसंघात ग. प्र. प्रधान, एन. डी. पाटील, प्रकाश जावडेकर, शरद पाटील यांसारखे व्यासंगी नेते निवडून गेले होते.

* आता त्या दर्जाचे उमेदवारही उरलेले नाहीत आणि नेत्यांना आपण काय प्रचार करतो याचे भान उरलेले नाही.

* समाजमाध्यमात उमटणाऱ्या प्रतिक्रियाच या नेत्यांच्या भाषणातून दिसतात, यासारखे दुर्दैव नाही, असे निरीक्षण ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांनी नोंदवले.