समाजातील जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यास दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली आहे. याशिवाय त्या दाम्पत्याच्या मुलांना शासकीय नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी केले. भारतीय जनता पक्षअनुसूचित जाती-जमाती आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
बडोले म्हणाले,ह्वनवबौद्धांना राज्य शासन सवलती देत आहे. त्याप्रमाणे केंद्र शासनाकडूनही सवलती मिळाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दलित उद्योजकांना कौशल्यशिक्षण देण्यासाठी नवीन संस्था सुरू करण्यात येतील. या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन दलित उद्योजकांना संधी उपलब्ध करून देऊ. अजूनही जातीचा दाखला काढणे, पडताळणी करणे किचकट असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे लवकरच जिल्हानिहाय जात पडताळणी समितीचे कामकाज सुरू होईल. कॉँग्रेस पक्षाने निवडणुकांसाठी दलितांचा वापर केला. मात्र विकासाकडे दुर्लक्ष केले. भाजप सत्तेवर आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी झाली. डॉ. आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी शासन नियोजनबद्ध प्रयत्नशील आहे.’’
आमदार हाळवणकर म्हणाले,’’ काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणास कंटाळून दलित, मागासवर्गीय मतदारांनी देशात आणि राज्यात भाजपला निवडून दिले. पुढील २५ वर्षे राज्यात भाजप सत्तेवर राहील.’’