करवीरनगरीत उद्यापासून सुरू होणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या साहित्यसंमेलनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीत साहित्यिक, ग्रंथप्रेमी नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. शनिवारी सकाळी साहित्यसंमेलनाला सुरुवात होणार असून, संमेलनाध्यक्षपदी ज्ञानेश्वर मुळे असून उद्घाटन ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते होणार आहे.
येथे ९ व १० जानेवारी रोजी दक्षिण महाराष्ट्र साहित्यसंमेलनाचे आयोजन राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये करण्यात आलेले आहे. २७व्या संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संमेलनामध्ये सहभागी होणारे प्रमुख पाहुणे, निमंत्रित, साहित्यिक, साहित्यप्रेमी यांची लगबग संमेलनस्थळी जाणवू लागली आहे.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी सायंकाळी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. बिंदू चौकापासून निघालेल्या ग्रंथदिंडीमध्ये स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे, दक्षिण महाराष्ट्र साहित्यपत्रिकेचे संपादक प्रा.चंद्रकुमार नलगे, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, उपसंचालक मकरंद गोंधळी, गोविंद पाटील, सहकार्यवाहक विनोद कांबळे, अनुराधा गुरव यांचा समावेश होता. झांजपथकाच्या वाद्यात निघालेल्या ग्रंथदिंडीमध्ये ग्रंथ व साहित्यसंमेलन याचा प्रसार करणारे फलक लावण्यात आले होते. अठरा शाळांचे विद्यार्थी, शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते.
दरम्यान, शनिवारी सकाळी साहित्यसंमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.