करोनामुळे जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक परप्रांतीय कामगार हे काम सोडून गेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्याबरोबरच उद्योगाची मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी कोल्हापुरात प्रयत्न सुरु झाले आहेत. जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी ‘माझं कोल्हापूर माझा रोजगार’ या अभियानातून नोकरी उपलब्ध करून देणारा उपक्रम शनिवारी हाती घातला.

यासाठी पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. विविध उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी कामगार कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याची माहिती दिली. सध्या कामगारांच्या मागणीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार ऋतुराज पाटील,आमदार चंद्रकांत जाधव, डी वाय पाटील शैक्षणिक प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी भूमिका मांडली. त्यानंतर मंत्री पाटील यांनी या अभियानाची घोषणा केली. याकरिता एक पोर्टल बनवले असून त्यावर कामाची संधी हव्या असणाºया कामगारांनी तसेच उद्योजकांनी आपली नोंदणी करावी लागणार आहे.