कोल्हापूर : करोनाबाबत वेळीच दक्षता घेतली नाही तर मुंबई—पुणे सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी दिला.

येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आज पालकमंत्री पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ.सुधीर सरवदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, करोना लक्षणे असणारे उपचारासाठी लवकर दाखल होत नाहीत. निदान होऊन उपचार होईपर्यंत करोनाचा फैलाव होत आहे. लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत. आतापर्यंत ५० हजार रुग्ण बरे झाले आहेत.

सध्याच्या महामारीत सर्व विभागाने काम करून मृत्युदर कमी करावा. संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन तयारी करावी.

कमी पडतोय; चिंतन आवश्यक

कोविड येण्यापूर्वी इतर रुग्णसंख्या मोठय़ासंख्येने असतानाही उपचाराबाबत नियोजन होत होते. सद्यस्थितीत, कोविडचे रुग्ण संख्या कमी असताना कुठे कमी पडतो का? आपण कुठे कमी पडतोय याचे चिंतन करणे आवश्यक आहे, असे नमूद करून त्यांनी सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाने थोडे जास्तीचे काम करावे, असा सल्ला दिला.

मन लावून काम करू

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला अधिक दक्षता घेऊन २४ तास सेवा देऊ. मन लावून काम करून मृत्यू दर रोखू,. रुग्ण बरे होऊन घरी जातील याची हमी देतो, असा विश्वास उपस्थित विभागप्रमुखांच्यावतीने डॉ. सरवदे, डॉ.उल्हास मिसाळ, डॉ.विजय बर्गे, डॉ. राहुल बडे यांनी व्यक्त केला.