येथे यंदा होणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे पडसाद दिसत असून संयोजकांनी दुष्काळी स्थितीला तोंड देण्यासाठी शेती व्यवसाय व शेतकऱ्यांनी सक्षम कसे व्हावे, या विषयी मार्गदर्शन करण्यावर भर दिला आहे.
सलग नवव्या वर्षी २३ जानेवारीपासून कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राऊंडवर भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात नवी कृषी उत्पादने शेतकऱ्यांना पाहता येतील, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खा. महाडिक म्हणाले की, देशातील आघाडीच्या उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्सचे या प्रदर्शनास मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. त्यांची नवी उत्पादने शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. यासह कृषी विज्ञान आणि संकरित बियाणे-निर्मिती क्षेत्रात कार्यरत डॉ. बावराकर बायोटेक प्रा.लि. यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. यासह महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, एन.सी.पी.एच आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांचे सहकार्य लाभले आहे. भीमा उद्योग समूहासह क्रिएटिव्ह इव्हेंटस् यांचे आयोजन करीत आहे. प्रदर्शनात दोनशेहून अधिक महिला बचत गटांना मोफत स्टॉल देणेत आले आहेत. प्रदर्शन पाहायला येणाऱ्यांना दुपारी मोफत झुणका भाकरी देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी केंद्रीत संस्था सहभागी होत आहेत. संकरित म्हशी तसेच कुक्कुटपालन, इमूपालन, वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबडय़ा, हलगीच्या तालावर नाचणारा घोडा याचेही पशू विभागात आकर्षण असणार आहे. जिल्ह्यात प्रायोगिक शेती करून भरघोस उत्पादन करणाऱ्या शेतकरी बंधूंचा या वेळी सत्कार केला जाणार आहे. मुख्य सभागृहात रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, तर दुपारच्या सत्रात कृषी तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. या पत्रकार परिषदेस रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, डॉ.धर्यशील बावसकर, श्रीधर बिरंजे, क्रिएटिव्ह इव्हेंटसचे सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.