कोल्हापूर : गुटख्याची पोती चोरल्याच्या संशयावरून कर्नाटकातील एकाचा दानोळी (ता. शिरोळ) येथे खून करण्यात आला. या गुन्ह्यत खूनप्रकरणी कर्नाटक राज्यासह दानोळी, कोथळी, इचलकरंजी, मिरज येथील सराईत दहा जणांचा समावेश असल्याचा संशय आहे. बुधवारी सहा जणांना जयसिंगपूर न्यायालयासमोर उभे केले असता ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपाधीक्षक किशोर काळे यांनी दिलेली माहिती अशी, की कर्नाटक राज्यातील तुमकूर औद्योगिक वसाहतीतून १८ जानेवारी रोजी कंटेनरमधून १४४ पोती गुटखा अथणीकडे घेऊ न चांदपाशा सनाउल्ला (वय २३) व नरसिंहमूर्ती (वय २८, दोघे रा. नीलमंगळा, जि. बेंगलोर) हे दोघे निघाले होते. गुटख्याची सुमारे दहा लाख रुपयांची ५३ पोती चोरीस गेल्याचे सनाउल्ला याच्या निदर्शनास आले.

अमानुष मारहाण

त्यातून कंटेनरचे मालक जुबेर अहमद, त्याचे साथीदार या सर्वांनी चांदपाशा, नरसिंहमूर्ती यांना अथणीमध्ये मारहाण केली. यानंतर त्यांना मिरजमध्ये डांबून ठेवून हॉकी स्टिक, काठय़ा व वायरने मारहाण करण्यात आली. नंतर दानोळी येथील फार्महाउसवर तिघांना अमानुष मारहाण करण्यात आल्याने अर्जुन (वय २७, पूर्ण नाव माहीत नाही, रा. खटिरवा स्टुडिओ, जि. बेंगलोर) याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या सतर्कतेने गुन्हा उघड

अर्जुन याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संशयित आरोपींनी नरसिंहमूर्ती याला दोन लाख रुपयांचे आमिष दाखवून अर्जुनचा मृतदेह घेऊ न जाण्यास सांगितले. त्याला जिवे मारण्याची धमकीही दिली. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अंकली टोलनाक्याजवळ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, यांच्या पथकाने तपासणी केली असता खुनाच्या प्रकरणाचा उलगडा झाला.