कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यपीठाच्या संगणक प्रणालीला ‘हॅकर्स’ने लक्ष्य केले. विद्यापीठातील वेग मंदावण्याचे प्रमाण वाढले. मात्र, संगणकाच्या सुरक्षाप्रणाली कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यात आल्याने ‘हॅकर्स’चा हेतू असफल ठरला. चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महत्त्वाची माहिती चोरण्याच्या उद्देशाने अनेक हॅकर्स डेटा चोरी करतात. अलीकडेच, रॅम्सनवेअर व्हायरसचा सायबर हल्ला होऊ न जगातील सुमारे शंभरपेक्षा जास्त देशांची संगणक यंत्रणा पुरती कोलमडली होती.  संगणकप्रणाली, संकेतस्थळांवर हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे.

विशेषत:  मोठय़ा प्रमाणात हिट्स असणाऱ्या  संगणकप्रणाली लक्ष्य केले जाते. चीनमधील हॅकर्सकडून १४ सप्टेंबर रोजी शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ही बाब लक्षात आल्यावर तातडीने उपाय केले. सुरक्षाप्रणालीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ केल्याने हॅकर्सचा हेतू असफल ठरला. विद्यापीठाचे संगणकप्रणाली सुरक्षेकडे बारीक लक्ष असते. आमची फायरवॉल ही प्रणाली सक्षम आहे.  सायबर ट्राफिकचे लॉग अ‍ॅनालेसिस नियमितपणे केले जाते. त्यामुळेच हॅकर्सचा संगणकप्रणालीत प्रवेश हा प्रयत्न  विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले.