‘अब की बार झूठ मत बोल यार’, अशी खिल्ली उडवणारी घोषणा देत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नोटाबंदीच्या विरोधात पंचगंगा पुलाजवळ पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सोमवारी करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यां नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नोटाबंदीमुळे सर्वच क्षेत्रात मंदी आली असून, शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. अशा भावना व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी जनतेचा संताप मतपेटीतून दिसून येईल असे मत मांडले.

नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास व मोदी सरकारची हुकूमशाही यांच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, महापौर हसीना फरास, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, प्रा. जयंत पाटील, जिल्हा बँकेचे बाबासाहेब पाटील आदींसह कार्यकत्रे आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यां नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तब्बल एक तास रास्ता रोको केल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.

एटीएम केंद्रासमोर बांधल्या म्हशी

जिल्हा बँकांना रोकड पुरवण्यात पक्षपाती धोरण स्वीकारत असल्याबद्दल आंदोलकांनी करन्सी चेस्ट असलेल्या बँकेच्या एटीएम केंद्रासमोर म्हशी बांधून निषेध नोंदवला. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजू लाटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामुळे एटीएम केंद्रात पसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची गरसोय झाली. जिल्ह्यातील काही शहरे व तालुक्याची गावे येथेही अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले. ई-लॉबीसारखी आधुनिक सुविधा बँका  राबवत असताना त्यातून पसे मिळण्याचे मूळ काम होत नसल्याने ही लॉबी म्हशी बांधण्याच्या योग्यतेच्या आहेत, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

क्रेन आणावी लागेल

महामार्ग रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने पोलीस अधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढत होती. पोलीस उपाधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, यांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली. तेव्हा नोटाबंदीचा त्रास पोलिसांनाही होतोच की, त्यामुळे पोलिसांनी सहकार्य करावे असे सांगताना ‘मौनं सर्वार्थ साधनम’ असा सल्ला  ‘वजनदार ’ आमदार मुश्रीफांनी देतानाच  ‘अटक करायची असेल तर सर्वाना उचलून न्या. मला न्यायला मात्र तुम्हाला क्रेन आणावी लागेल’ असे सांगताच आंदोलनामुळे गंभीर झालेल्या पोलिसांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले.