हसन मुश्रीफ यांची राजू शेट्टींवर टीका

कोल्हापूर : उसाला एफआरपी देण्याचा कायदा झाला असताना ऊस परिषद घेऊन ऊस दरासाठी आंदोलन करणे हे एक कोडेच आहे. ते कशासाठी केले जाते, असा प्रश्न उपस्थित करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी राजू शेट्टी यांना लक्ष्य केले. एकीकडे शेट्टी यांचे स्पर्धक सदाभाऊ खोत यांनी ऊस परिषदेवरून शेट्टी यांच्यावर निशाणा साधला असताना आता महा विकास आघाडीतील मंत्री मुश्रीफ यांनीही याच मुद्दय़ावरून शेट्टी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मुश्रीफ यांनी ऊस परिषदेच्या मुद्दय़ाला हात घातला. ते म्हणाले,‘ केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी एफआरपी कायदा आणल्यामुळे उसाचे दर निश्चित झाले आहेत. जिल्ह्यात एकरकमी एफआरपी दिली जात आहे. अन्य जिल्ह्यात त्याचे तुकडे केले जातात. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातच ऊसदराचे आंदोलन कशासाठी होते, हा प्रश्न आहे. शेट्टी यांनी आंदोलनाची दिशा बदलण्याची गरज आहे.’ साखर कारखानदारी अडचणीत आली असून केंद्र शासनाने मदत करावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदी व शहा यांच्याकडे प्रयत्न केले पाहिजेत. साखरेची विक्री किंमत वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.