राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यातील सुप्त संघर्षांला जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सोमवारी उघडपणे तोंड फुटले. मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना थेट महाडिक यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका व्यक्त करत  महाडिक यांचावर निशाणा साधला  आहे .

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले  खासदार धनंजय महाडिक हे  महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारापासून  दूर राहिले आहेत. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षात आहेत,  असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांनी  याबाबतची  आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली. खासदार राजू शेट्टी व  सदाभाऊ खोत यांच्यातील वाद दुर्देवी असल्याचे  मत मुश्रीफ यांनी मांडले.

कोल्हापूर  जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ११ ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर विविध पंचायत समित्यांमध्ये २४ उमेदवार विजयी झाले आहेत.   या विजयी उमेदवारांचा सत्कार आज राष्ट्रवादी  कॉंग्रेस जिल्हा कार्यालयात आमदार मुश्रीफ आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या सत्कार समारंभानंतर  मुश्रीफ यांनी पत्रकारांशी  संवाद साधला. जिल्हा परिषद व पंचायत  समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या सत्कारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येईल , या प्रश्नावर ते म्हणाले , जिल्ह्यात पहिल्यांदाच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे .  या मध्ये शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.  आपण मित्र पक्ष असलेल्या कॉंग्रेस व्यतिरिक्त अद्याप कोणाशीही चर्चा केली नाही . मुंबई महापालिकेच्या घडामोडीवर  कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये  शिवसेनेची भूमिका ठरणार असल्याने  अजून सत्तेचे  चित्र स्पष्ट व्हायला आणखी  आठवडा लागेल , असा अंदाज मुश्रीफ यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या निमित्ताने पक्षापासून दुरावलेल्यांना परत प्रवाहात येण्याचे  आवाहनही  मुश्रीफ यांनी केले

कागल तालुक्यांमध्ये भाजप दोन क्रमांकाचा पक्ष असल्याचा दावा समरजीत घाटगे यांनी केला आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले , आपला  उमेदवार निवडून येणार नाही हे माहित असताना देखील घाटगे यांनी आक्रमक प्रचार केला याचं कौतुक आहे , असा खोचक टोलाही आमदार मुश्रीफ यांनी लगावला.