16 October 2019

News Flash

विवाहबाह्य संबंधामुळे वाद, महिलेच्या धमकीमुळे मुख्याध्यापकाची आत्महत्या

महिलेने या प्रकरणी पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी चौकशीसाठी भास्कर यादव यांना बोलावले होते.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

विवाहबाह्य संबंधांतील वादातून महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज केल्याने घाबरलेल्या मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली. अण्णासाहेब डांगे शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक भास्कर मारुती यादव (वय ५२) यांनी गळफास घेत आत्महत्या केली असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळेत भास्कर यादव हे मुख्याध्यापक होते. शनिवारी सकाळी भास्कर यादव यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी यादव यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात त्यांनी विवाहबाह्य संबंधातील वादाचा उल्लेख केल्याचे समजते. भास्कर यादव यांचे शाळेतील एका शिक्षिकेशी संबंध होते. या महिलेने यादव यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. यादव यांनी पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडून त्या शिक्षिकेशी लग्न केले. तिला घर आणि गाडीची व्यवस्थाही करुन दिली.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून यादव आणि त्या महिलेत वाद सुरु होते. महिलेचे आणखी एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय यादव यांना होता. दोघांमधील वाद वाढले होते. वाद वाढल्याने यादव पेठ वडगाव येथे पहिल्या पत्नीसोबत राहायला गेले. दुसरीकडे हातकणंगलेत महिलेने पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्ज मागे घ्यायचा असल्यास ३० लाख रुपये द्यावे, अशी मागणी तिने यादव यांच्याकडे केली होती. आता आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यास नोकरी जाईल, या भीतीपोटी त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी यादव यांचा मुलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला आहे.

First Published on January 12, 2019 4:26 pm

Web Title: hatkanangale headmaster commits suicide after extra marital affair went wrong