दोन खासदार निवडून आल्याने स्वप्न साकार

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आले की एकच अपेक्षा व्यक्त करायचे- ‘मला कोल्हापुरातून लोकसभेवर भगवा फडकलेला पाहायचा आहे!’ त्यांचे हे स्वप्न कित्येक वर्षांच्या प्रयत्नांनी साकार झाले. शिवसेनेचे दोन खासदार निवडून आले आहेत. कोल्हापुरातून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने.

लोकसभा निवडणुकीतील या निर्भेळ यशाने कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिवसेनेची ताकद वाढली आहे. जिल्ह्य़ात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या किती वाढते, याचीच उत्सुकता आहे.

राजकीय क्षितिजावर कोल्हापूर जिल्हा आजवर काँग्रेस – राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जातो. त्याआधी काही काळ ‘शेकाप’चा जमाना होता. गेल्या २५-३० वर्षांत या जिल्ह्य़ात शिवसेनेचा शिरकाव झाला. काँग्रेसच्या लाटेत शिवसेनेचे पानिपत होत असे. पण, बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापुरात शिवसेना रुजवण्यासाठी कष्ट घेतले. दीड – दोन दशकांत या प्रयत्नांना फळ आले. शिवसेनेचे आमदार विधानसभा गाठण्यात यशस्वी ठरले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात १० पैकी ६ जागा शिवसेनेने जिंकल्या. विधानसभेत भरभरून यश मिळत असताना शिवसेनेला कोल्हापुरात आपला खासदार नसल्याचा सल होता. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न अधुरे राहिले होते. ते या लोकसभा निवडणुकीत साकार झाले.

शिवसेनेचे बेरजेचे राजकारण

शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी सुरुवातीपासून सावध रणनीती आखली. बेरजेच्या राजकारणाला महत्त्व दिले. राष्ट्रवादीचे दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक यांना गेल्या निवडणुकीतच शिवसेनेने आपल्या तंबूत आणले होते. यावेळी काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांचे नातू आणि राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनाही शिवबंधन बांधले गेले. मंडलिक – माने यांचा मतदारसंघात गट होता. त्याला शिवसेना आणि मित्रपक्षांची जोड मिळाली. या सर्वानी एकसंघ प्रचार करून रान उठवले. परिणामी, धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी यांच्यासारखे शक्तिशाली उमेदवार असतानाही महाआघाडी निष्प्रभ ठरली. मंडलिक यांनी विक्रमी पावणेतीन लाख, तर माने यांनी लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला.

चंद्रकांतदादांची साथ

शिवसेनेच्या कामगिरीत भाजपची साथही महत्त्वपूर्ण ठरली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे महाडिक परिवाराशी वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे ते महाडिक यांना आतून मदत करीत असल्याची कुजबुज ‘भाजप’ने सुरू ठेवली होती. मात्र, पाटील यांनी ‘मैत्री आणि राजकारण याचा काहीही संबंध नाही’, असे निक्षून सांगितले. खेरीज, महाडिक यांच्या राजकारणाला ‘अर्थ’ मिळवून देणाऱ्या ‘गोकुळ दूध संघा’ला बहुराज्य दर्जा मिळवू देणार नाही, अशी घोषणा करून त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला. पंतप्रधान मोदी यांच्यावर शेट्टी टोकाची टीका करीत असल्याने भाजपची सारी यंत्रणा माने यांच्या प्रचारासाठी ताकदी काम करत होती. परिणामी, शेट्टी यांच्यासारख्या प्रबळ उमेदवार पराभूत झाला.