कोल्हापूर : करोनाच्या संकटकाळात आमदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यात वाद विकोपाला गेल्याचे इचलकरंजी येथे सलग दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाले. आयजीएम रूग्णालयाकडील ४२ वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी यांना कोविड उपचारात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यांनी सेवेत सामावून घेण्याचे आदेश प्राप्त होवूनही वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तांत्रिक मुद्दा उपस्थित होऊ लागल्याने आमदार प्रकाश आवाडे यांनी रुग्णालयाबाहेरच तंबू लावून आरोग्यसेवा पुरवण्याचा इशारा गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिल्याने हा वाद वाढतच असल्याचे दिसत आहे.

पूर्वीच्या आयजीएम कडील ४२ जण विनामोबदला आरोग्यसेवा देण्यास तयार आहेत. त्यांना सेवेत रुजू करुन घ्यावे या मुद्दावरून आमदार आवाडे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांच्यात काल वाद झडला होता. आवाडे यांनी पाठपुरावा केल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ४२ जणांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कोविड उपचारात रुजू करुन घेण्यासंदर्भात लेखी आदेश दिले. शेट्ये यांची बदली करण्याची मागणी आवाडे यांनी केली होती.

मंत्र्यांचे आदेश दुर्लक्षित

वैद्यकिय अधिक्षकांचा नकार कायम राहिल्याने आज आवाडे पुन्हा रुग्णालयात आले. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्स डॉ. बी. सी. केम्पीपाटील हे सुध्दा उपस्थित होते. रुग्णालयातील मनमानी कारभार, अपुऱ्या आरोग्यसेवेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतानाच आवाडे यांनी त्या ४२ जणांना विनामोबदला सेवेसाठी रुजू करुन घ्यावे असे सांगितले. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने आवाडे यांनी या थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी संपर्क साधल्यावर मंत्र्यांनी रुजू करुन घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरही जिल्हा शल्यचिकित्सका तांत्रिक मुद्द्यावर ठाम राहिल्याने संतप्त आवाडे यांनी रुग्णालयाच्या बाहेरच तंबू मारुन जनतेला आरोग्यसेवा पुरवू असा इशारा दिल्याने हे प्रकरण कसे वळण घेणार याकडे लक्ष लागले आहे.