कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे सायंकाळी उघडले होते. पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची चिन्हे असून पुन्हा एकदा पूरस्थिती उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली होती. अनेक नद्यांना पूर आला होता. नागरिकांचे स्थलांतर केले जात होते. एनडीआरएफचे पथक कार्यरत होते. गेल्या आठवडय़ात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पावसाचे प्रमाण कमी झाले होते.

राधानगरी धरण तुडुंब

कालपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याचे वृत्त आहे. पावसाचा वेग वाढल्याने राधानगरी धरणाचे चार दरवाजे पुन्हा उघडण्यात आले असून आणखी दोन उघडले जाण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची काल सकाळी दहा वाजता पाणी पातळी ही २७ फूट इतकी होती. आज सकाळी दहा वाजता ती ३३ फूट तर सायंकाळी ५ वाजता ३५ फुट होती. काल ४६ बंधारे पाण्याखाली होते. आज ही संख्या ७२ पर्यंत गेली आहे.

अलमट्टीवर मंत्र्यांचे लक्ष

कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या फुगवटय़ामुळे शिरोळ तालुक्यात महापूर येतो. त्यामुळे अलमट्टी धरणातील विसर्गावर राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा. अलमट्टी मधील विसर्ग १ लाख ८० हजार होता. दूरध्वनीवरून चर्चा करुन तो वाढविण्याची विनंती यड्रावकर यांनी केली त्यावर तो २० हजारने वाढवला आहे.  पूरनियंत्रण करू असे जारकीहोळी म्हणाल्याचे यड्रावकर म्हणाले.