कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊ स सुरु आहे. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊ स पडला. गेल्या २४ तासांहून अधिक वेळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज ११ जुलै आणि उद्या १२ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा आपत्ती निवारण केंद्राने दिला आहे.

दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आज जोरदार वृष्टी केली. पावसामुळे कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, राजारामपुरी चौक, शाहूपुरी या ठिकाणच्या सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पंचगंगा नदी इशारापातळी गाठू शकेल अशी परिस्थिती आहे. सायंकाळी ५ वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाणीपातळी ३६ फुट होती. आज दुपारी पाणीपातळी ३४ फुटांवर होती. नदीकाठच्या परिसरातील सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

ग्रामीण जनजीवन विस्कळीत

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मुसळधार पाऊ स पडत आहे. राधानगरी धरण ६० टक्के भरले आहे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी सुरू असून अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गगनबावडा तालुक्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 पर्यायी मार्गाने वाहतूक

कुंभी नदीवरील कळे आकुर्डे मार्गावर असलेल्या गोठे पुलावर अंदाजित दोन फुट पाणी आल्यामुळे रस्ता बंद झालेला आहे. पुलावर पाणी आल्यामुळे गोठे आकुर्डे तांदूळवाडी, मेंगडेवाडी, हरपवडे, निवाची वाडी, पणुत्रे या गावांकडे जाण्यासाठी मासुर्ली  गावाकडून पर्यायी मार्ग सुरू आहे. चंदगड तालुक्यात ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी, कुरतन वाडी, कोवाड, माणगाव बंधाऱ्यावर पाणी आहे. पुलावर पाणी आल्यामुळे चंदगड आगाराचे चंदगड-भोगोली, चंदगड-गवसे, नागनवाडी-नांदवडे आणि हलकर्णी-करजगांव मार्ग बंद झाले आहेत. सर्व ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.