News Flash

तीन डझन पुलांची उंची वाढविणार का?

गेल्या आठवडय़ात पुन्हा शेकडो गावांतील लोक- सुमारे तीन लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले.

तीन डझन पुलांची उंची वाढविणार का?

|| दयानंद लिपारे
अजित पवार यांच्या कोल्हापूरमधील घोषणेबाबत संभ्रम
कोल्हापूर : महापुराच्या कारणांचा शोध घेताना नद्यांवरील पुलांचे महाकाय भराव हा नवा मुद्दा पुढे आला आहे. त्याची तीव्रता स्थानिक लोकप्रतिनिधींनी मांडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातील दोन पुलांची उंची वाढवण्याची घोषणा दिलासादायक ठरली. मात्र कराडपासून ते अलमट्टी धरणापर्यंत अशा प्रकारचे महाकाय सुमारे तीन डझनाहून अधिक पूल झाले असून त्यांच्या धरणसदृश भरावातून निर्माण होणाऱ्या महापुराचे काय होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नव्या दोन पुलांचे काम कोण करणार, त्याच्या खर्चाचे नियोजन काय, केंद्र- राज्य शासन राजकीय कोंडी याविषयी संभ्रम आहे.

जिल्ह्य़ात सन १९८९, २००५, २०१९ या वर्षी प्रलयंकारी महापूर आला. गेल्या आठवडय़ात पुन्हा शेकडो गावांतील लोक- सुमारे तीन लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले. महापूर येऊ नये यासाठी उपाययोजना शोधल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा पाहणी दौरा झाला. कोल्हापुरातील महापुराचे कारणे शोधताना यामध्ये पंचगंगा नदीवरील पुलाची उंची वाढल्यामुळे धरणसदृश भरावाच्या भिंतीमुळे महापुराचे पाणी प्रवाहित होत नाही. ते तुंबून फुगवटा निर्माण होऊन शहर, ग्रामीण भागात महापुराची तीव्रता वाढते असा मुद्दा पुढे आला. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्ग तसेच रत्नागिरी – हैदराबाद (सांगली सोलापूर शहरावरून जाणाऱ्या) महामार्गावरील कोल्हापुरातील शिवाजी पूल येथे उड्डाण पुलाची उंची वाढविण्यात येईल, असा दिलासादायक निर्णय घेतला. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि रस्ते अभ्यासकांनी पूल बांधणीच्या चुकीच्या कामावर बोट ठेवले आहे. ‘कोल्हापूर -रत्नागिरी महामार्ग रुंदीकरणाचे वेळी भर टाकून उंची वाढविण्यात आली. यावेळी पंचगंगा नदीपात्राचे भान स्थापत्य अभियंता विभागाने ठेवायला हवे होते. महामार्ग उंची वाढल्याने भक्कम बांध स्वरूपाने अडवतो. हे समस्येचे मूळ आहे. दूरदृष्टी व तांत्रिक अभ्यासाचा हा अभाव आहे. १५ कोटी खर्चाच्या नवीन शिवाजी पुलाचे पिलर पुराच्या पाण्याच्या  प्रवाहाला अडथळा करतात; हीदेखील तांत्रिक चूक आहे,’ असे मत राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा समिती सदस्य विनायक रेवणकर यांनी व्यक्त केले.

अन्य पुलांचे काय?

दुसरीकडे, अन्य पुलांच्या भरावाबाबत काय होणार, हा मुद्दा कोणी अद्याप विचारात घेतलेला नाही. २००५ च्या महापुरात शेकडो खेडय़ांमध्ये पाणी आल्यावर सुरक्षित स्थळी जाणेही अशक्य झाले होते. ही बाब लक्षात घेऊन दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात दळणवळण सुलभ व्हावे यासाठी नवे पूल बांधण्याची जणू मोहीमच हाती घेतली गेली. कराडपासून ते अलमट्टी धरण या जवळपास ४०० किलोमीटरच्या अंतरामध्ये सुमारे तीस पूल बांधले गेले. त्यासाठी उंचच्या उंच आकाराचे भराव टाकण्यात आले. पुलाच्या ठिकाणी कमानी (मोऱ्या) अधिक बांधल्या असत्या तर पुराचे पाणी सहजपणे प्रवाहित झाले असते. अधिकचा खर्च वाचवण्याचा शासकीय हिशोबीपणा नडला आणि कमानी संख्या घटली. परिणामी सर्व पुलांच्या ठिकाणी जणू धरणाच्या आकाराच्या अवाढव्य भराव उभे राहिले आहेत. कोल्हापूरपासून ते नरसिंहवाडीपर्यंत २० किलोमीटरच्या अंतरामध्ये शिवाजी, पंचगंगा, इचलकरंजी व नरसिंहवाडी पूल असे चार पूल असून चंदूर येथे प्रस्तावित पूल आहे. एका शिरोळ तालुक्यात चार पूल बांधले आहेत. अन्य ठिकाणच्या पुलाच्या भरावाचा परिणाम भविष्यात कोल्हापूरलाही फुगवटय़ाच्या रूपाने सतावणार आहे. त्यामुळे सर्वच पुलांची उंची वाढवण्याचा आणि त्याला योग्य प्रमाणात कमानी ठेवण्याचा विचार झाला पाहिजे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.

राजकीय अडवाआडवी ?

पंचगंगा नदीवर पाणी आल्याने पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक चार दिवस तर २००५, २०१९ सालच्या महापुरात आठवडाभर वाहतूक बंद होती. आता नव्याने पूल बांधायचा असला तरी त्याचे काम कोण करणार हा प्रश्न सतावणारा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ सध्या पुलाचे देखभाल दुरुस्तीचे काम पाहत असून त्यासाठी कोटय़वधी निधी खर्च केला असून तो केंद्र शासनाकडून मिळालेला नाही. ‘देखभाल दुरुस्तीच्या कामात कसूर ठेवली जात नाही. वाहतूकदार, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. महापुराच्या काळात हा रस्ता लवकर सुरू व्हावा यासाठी रस्ते विकास मंडळाने काम केले,’ असे राज्य रस्ते मंडळाचे उपअभियंता समाधान पाटील यांनी सांगितले. ‘उपमुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीनंतर पुलाची उंची तीन ते चार मीटरने वाढवण्याचा आराखडा तयार केला जात आहे. आवश्यक ठिकाणी कमानी (बॉक्स) बनवल्या जाणार आहेत. शिरोली फाटा ते कोल्हापुरातील प्रवेशद्वार अंतरावर पुलाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग करवी केले जाणार आहे,’ असे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पंढरकर यांनी सांगितले. केंद्र – राज्य ताणलेले संबंध पाहता शिवसेनेकडे हे खाते असल्याने कामाला मंजुरी आणि निधी देणार का, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सातारा – कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम अनेक वर्षे खोळंबले आहे, हा पूर्वानुभव पाहता नवे काम पूर्ण कधी होणार याचे उत्तर सोपे नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 12:02 am

Web Title: heavy rainfall bridge state government ncp ajit pawar akp 94
Next Stories
1 पूररेषा सोडत घरे बांधावी लागतील – अजित पवार
2 पुराला कारणीभूत ठरणाऱ्या पंचगंगा नदीवरील पुलाची शास्त्रोक्त उभारणी करणार; अजित पवार यांचे पूरग्रस्तांना आश्वासन
3 पुराचे स्वरूप बदलल्याने नव्याने नियोजनाची गरज
Just Now!
X