कोल्हापूर जिल्ह्य़ात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर  महावितरणचा विभाग या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात दोन दिवसांत शंभरावर खांब पडले आहेत. त्यातील २४ खांब भरपावसात उभे करून वीजपुरवठा सुरू केला असल्याची माहिती मंगळवारी कोल्हापूर परिमंडलचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी येथे दिली.

पूरस्थिती लक्षात घेता सावधगिरी म्हणून नदीकाठच्या वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गरजेनुसार बंद ठेवला जात आहे. यामुळे अप्रिय घटना टाळता येतील. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने तारा तुटून वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. माकवे शाखेअंतर्गत दूधगंगा नदीच्या बॅकवाटरमुळे महावितरणच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीचा पोल पूर्णत: झुकला गेला होता. त्यामुळे आज सकाळी ही लाईन बंद करून संबंधित गावांना दुसऱ्या लाईनवरून जोडून वीजपुरवठा दुपापर्यंत पूर्ववत करण्यात आला. जिल्ह्य़ात दोन दिवसांत शंभरावर खांब पडले आहेत. त्यातील २४ खांब भरपावसात उभे करून वीजपुरवठा सुरू केलेला आहे. विशेषत: आजरा, चंदगड, गगनबावडा, गडिहग्लज, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी आदी परिसरात खांब पडले आहेत. नागरी वस्तीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिले जात असून उपलब्ध परिस्थितीनुसार उर्वरित वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे.

नागरिकांनी तुटलेल्या तारेपासून दूर रहावे, त्यास उचलण्याचा प्रयत्न करू नये. अशा घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास महावितरण कर्मचारी, अभियंत्यांशी संपर्क साधावा. विजेसंबंधीच्या तक्रारीसाठी १८००२३३३४३२ व १९१२ यापकी कोणत्याही टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या तातडीने सोडविल्या जात आहेत. नागरिकांनी विजेचे साहित्य हाताळतानाही काळजी घ्यावी. पावसाची संततधार चालूच असल्याने घराच्या भिंती ओलसर झाल्या आहेत. अशावेळी घराची वायिरग सुरक्षित असल्याची खात्री करावी. ओल्या हाताने वीज उपकरणे हाताळू नयेत. प्लास्टिक चप्पल अथवा गमशूजचा वापर करावा. मोटार चालू करताना टेस्टरचा वापर करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. महावितरणचे जनमित्र, अभियंते, अधिकारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.