कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजगादीप्रमाणेच कुस्तीचीही देदीप्यमान परंपरा आहे. इथल्या लाल  मातीत अनेक हिरे चमकले. त्यात प्रभावशाली आणि आपल्या कामगिरीने डोळे दिपायला लावणारा हिरा म्हणजे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर. कुस्ती त्यांच्या नसानसात भिनलेली. जगभर डंका वाजवलेल्या या भारदस्त  मल्लाचा ‘कुस्ती हाच माझा प्राण आहे आणि तालीम हा माझा श्वास’  होता आणि तो अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्यांच्या जाण्याने कोल्हापूरची लाल माती पहाडी छातीच्या आणि साधेपणातही ताकद असलेल्या कुस्तीगीराला मुकली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपतराव आंदळकर हे पल्याडच्या सांगली जिल्ह्यतील पुनवतचे. १९३५ साली एका शेतकरी कु टुंबात ते जन्मले, पण त्यांचा जीव रंगला तो कोल्हापुरात. येथील ऐतिहासिक भवानी मंडपातील मोतीबाग तालीम ही त्यांच्या कर्तबगारीची साक्ष देते.   मल्लविदेला त्यांनी जीवन समर्पित केले होते.

आंदळकर यांच्या नावाचा दबदबा १९६०—७० च्या दशकातला.राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय मल्लांशी झुंजत त्यांनी  कुस्ती रसिकांची मने  जिंकली. कोल्हापूरच्या ख्यातनाम  खासबाग मैदानात १९५८ साली पाकिस्तानचा पैलवान नासिर पंजाबी याला चारीमुंडय़ा चीत करून आक्रमक कुस्तीची झलक दाखवली आणि कुस्ती  रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले. तेव्हाच्या जवळपास सगळ्या मल्लांशी त्यांनी दोन हात केले. मोती पंजाब,पहिले हिंद केसरी श्रीपाद खंचनाळे ,  मंगल पैलवान, बनातसिंग पंजाबी, हनीफ अहमद ,श्रीरंग जाधव यांच्याशी तोडीस तोड कुस्ती केली.

मल्लविद्येतील त्यांची प्रगती पाहून १९६० साली मुंबईत झालेल्या ‘हिंद केसरी’ स्पर्धे साठी निवड झाली. पंजाबचा पैलवान खडकसिंग याला १० विरुद्ध ५ अशा गुण फरकाने हरवून हिंद केसरी गदेचा बहुमान मिळवला. कोल्हापूरच्या लालमातीची   देशातील कुस्तीजगतात द्वाही फिरली. १९६२ मध्ये जकार्ता एशियाड स्पर्धेत ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक, तर फ्री स्टाईलमध्ये रौप्य असे दोन्ही प्रकारामध्ये पदकाची कमाई केल्याने कुस्तीप्रेमींना त्यांना कोठे ठेवू असे झाले. गादीवरील खेळाचा पुरता अनुभव नसतानाही १९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या मल्लाशी कुस्ती म्हटली की कुस्तीशौकिनांना चेव चढतो.  एक दोन नव्हे तर तब्बल ४० पाकिस्तानी मल्लांना अस्मान दाखवून त्यांनी कोल्हापूरच्या मातीची ताकद दाखवून दिली. अशी देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या या मल्लाला अर्जुन पुरस्कार, शिव छत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव आणि कोल्हापूर भूषण,  राजर्षी छ. शाहू असे अनेक पुरस्कार मिळाले.

कुस्तीक्षेत्र आंदळकर यांना ‘वस्ताद’ म्हणून ओळखते. पिळदार शरीरयष्टी असतानाही साधेपणाने जग जिंकता येते हे दाखवून देणाऱ्या आंदळकर यांनी  मोतीबाग तालमीत नव्या दमाचे मल्ल घडवण्याचा वसा घेतला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hind kesari ganpatrao andalkar relation with kolhapur
First published on: 18-09-2018 at 04:33 IST