केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांतून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी धर्मीय शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देणारे ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ संमत केले. सरकारने घेतलेला हा निर्णय देशभरातील काही धर्मांध आणि कम्युनिस्ट संघटनांना रुचलेला नाही. त्यामुळेच त्यांनी काही राज्यात हिंसक आंदोलने चालू केली आहेत. विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करीत हिंदू जनजागृती समितीने गुरुवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

हिंदू जनजागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे समन्वयक मनोज खाडये यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ साहेब गलांडे यांना देण्यात आले.

खाडये म्हणाले,की सरकारने लोकशाही मार्गाने स्तुत्य असा निर्णय घेतला असून मोदी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करत सरकारचे अभिनंदन करतो. सरकारने घेतलेला हा निर्णय देशविघातक कारवाया करणाऱ्यांना रुचलेला नाही. त्यांनी हिंसक आंदोलने चालू केली असून ती निषेधार्ह आहेत. अशी आंदोलने करून देशाची अखंडता भंग करणाऱ्या  समाजकंटकांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली .

शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शरद माळी, अधिवक्ता प्रकाश खोंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, हिंदू महासभेचे नंदकुमार घोरपडे, विश्व हिंदू परिषदेचेअशोक रामचंदानी,  रामभाऊ  मेथे,  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी सहभागी झाले होते.