News Flash

पुरोगामी दलालांकडून हिंदू धर्म विटंबनेचे काम

कोल्हापुरात हिंदू धर्मजागृती सभा

तथाकथित पुरोगामींकडून सध्या हिंदू धर्म विटंबनचे तसेच वैचारिक दहशतवाद पसरविण्याचे काम सुरू आहे. या दलालांकडून हा धर्म संपविण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. त्यांचा हा दहशतवाद झुगारून लावून या विरोधात बंड करण्याचे आवाहन हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी येथे केले.
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथे हिंदू धर्मजागृती सभा झाली. यावेळी समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, सनातन संस्थेच्या स्वाती खाडय़े प्रमुख उपस्थित होत्या. शिवसेनेचे उपशहरप्रमुख रघुनाथ टिपुगडे यांच्या हस्ते वक्त्यांचा तलवार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी शमशुद्दीन मुश्रीफ यांच्यासह डॉ. भारत पाटणकर, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आदींना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, की हे पुरोगामी दलाल आहेत. त्यांच्याकडूनच अधिकतर वैचारिक दहशतवाद आणि तोही केवळ हिंदू धर्माविरुद्ध पसरविला जात आहे. शमशुद्दीन मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात २६/१ चा हल्ला पाकिस्तानने केलेला नसल्याचे म्हटले आहे. या पुस्तकाची प्रसिद्धी हे पानसरे करीत होते; म्हणून पानसरे यांना मी धर्मद्रोही मानतो. त्यामुळे ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकाबाबत जाहीर वाद घेण्याचे आव्हान त्यांना मी दिले होते.
ही सर्व मंडळी फक्त हिंदू धर्माविरुद्धच बडबडतात. हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य करतात. दुसऱ्या धर्मातील गोष्टींबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत. यामुळेच ही मंडळी दलाल शोभतात. ही स्थिती बदलण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन करून स्वाती खाडय़े यांनी ‘सनातन’ला संपविण्याची भाषा करणाऱ्या ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांच्या फुत्काराने ‘सनातन’ संपणार नसल्याचे स्पष्ट केले.
हिंदू संघटनांनी एकत्र येऊन ‘इंडिया अगेन्स्ट आयसिस’ सुरू केले आहे. त्याद्वारे हिंदूंना ‘आयसिस’विरोधात लढण्याचे बळ दिले जाणार असल्याचे नमूद करून घनवट म्हणाले, आज आतंकवादी याकूब मेमन, कसाबला वकील मिळतो; पण पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाडला कोल्हापुरात वकील मिळू नये, हे दुर्दैव आहे. देशातील हल्ले थांबविण्यासाठी हिंदू राष्ट्राची निर्मिती गरजेची आहे. त्याची निर्मिती २०२३ पर्यंत केल्याशिवाय गप्प बसणार नाही. यावेळी राजन बुणगे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2016 3:30 am

Web Title: hinduism disgrace from the progressive agents
टॅग : Hinduism,Kolhapur
Next Stories
1 युवक काँग्रेस अध्यक्षांकडून पदाधिका-यांची कानउघडणी
2 घरफाळा थकबाकीबाबत कोल्हापुरात रुग्णालयांना टाळे
3 नोटिशींमुळे सहकार सम्राटांमध्ये अस्वस्थता
Just Now!
X