|| दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जनसंघर्ष यात्रेच्या नावाखाली देवदर्शनास प्राधान्य

सत्ताधारी भाजपच्या कामगिरीचा पंचनामा करण्यासाठी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू होत असताना काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाला हात घातला असल्याचे दिसून येत आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊ न सुरू झालेल्या या ‘यात्रेत’ यापुढेही जागोजागी देव देवता आणि संतांच्या दर्शनाला प्राधान्य देण्यात आले आहे. काँग्रेस धर्मविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढून आपली संस्कृती संवर्धनाची प्रतिमा उजळ करण्याचा यामागे हेतू असल्याचेही दिसत आहे.

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला. त्याला काँग्रेसच्या कामगिरीबरोबरच भाजप  शिवसेनेने काँग्रेसच्या विरोधात धार्मिक मुद्दय़ावरून केलेली टीकाही कारणीभूत ठरली होती. काँग्रेस हिंदुत्वाच्या, प्रथा परंपरेच्या विरोधात असून अल्पसंख्याकांचे लांगूनचालन करत असल्याची जोरदार टीका झाली होती. त्यामुळे जनमत काही प्रमाणात काँग्रेस विरोधात जाण्यास मदत झाली होती.

त्याचा वेध घेऊन काँग्रेसने धार्मिक मुद्यावरून टीकेचे धनी होणार नाही याची काळजी घेण्यास सुरुवात केल्याचे अनेक घटनांवरून अधोरेखित झाले आहे .

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडे आपल्या दौऱ्यात हिंदुत्वाची कास धरल्याचे अनेकदा दिसले आहे . गुजरात विधानसभा निवडणूक असो की अलीकडेच पार  पडलेली कर्नाटक विधानसभा निवडणूक असो, या वेळी गांधी यांनी जाणीवपूर्वक महत्त्वाच्या मंदिरात जाऊन विधिवत देवपूजा करण्यावर भर दिला होता. त्यांच्या भूमिकेचे राजकीय पडसादही उमटले होते. काँग्रेसही सौम्य हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता, तर  राहुल गांधींच्या सौम्य हिंदुत्वाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी उघडपणे सांगितले होते . कडवट हिंदुत्ववाद्यांनीही या भूमिकेचे स्वागत केले होते.

आज ‘शिवभक्त’ राहुल गांधी कैलास यात्रेवर असताना इकडे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या चरणी लीन झाले होते. ‘राज्याला चांगले दिवस येवोत’, असे साकडेही त्यांनी घातले. खरगे  यांनी आपल्या भाषणात शाहू , फुले ,आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करून पुरोगामी विचारधारा अधोरेखित करतानाच महालक्ष्मीचे दर्शने घेऊ न आम्ही आस्थेची जपणूक करत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

जनसंघर्ष आणि देवदर्शनही

काँग्रेसपक्षाची जनसंघर्ष यात्रा पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस फिरणार असताना त्यामध्ये  सौम्य हिंदुत्वाची जपणूक केल्याचेही दिसत आहे . उद्या शनिवारी नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेतले जाणार आहे. सांगलीत गणेशाचे दर्शन, तर  सातारा जिल्ह्यत माण तालुक्यात शिखर—शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेतले  जाणार आहे . सोलापूर जिल्ह्यत पंढरपूर येथे विठ्ठल आणि अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतले जाणार आहे. राजकीय बांधणी करतानाच काँग्रेसने लोकांच्या आस्थेची आस्थापूर्वक जपणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. यात्रेचे संयोजक आमदार सतेज पाटील यांनी तर, काँग्रेसने संस्कृती परंपरा यांची नेहमीच  जपणूक केल्याचे सांगत महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindutva congress party
First published on: 01-09-2018 at 01:35 IST