23 July 2019

News Flash

पंधरा वर्षांत शेट्टींचे मित्रही बदलले अन् चिन्हही

शेट्टी यांनी ऊस दर आंदोलनात स्वतची प्रतिमा कृष्णाकाठी निर्माण केली.

राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यंदा क्रिकेटची ‘बॅट’ घेऊन लोकसभेच्या मदानात उतरणार आहेत. हे त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे चौथे चिन्ह. विशेष म्हणजे विधानसभेची एक आणि लोकसभेच्या तीन अशा १५ वर्षांतील निवडणुकांवेळी शेट्टी यांचे चिन्ह आणि मित्रपक्षही बदलत गेले आहे. या वेळच्या लोकसभा निवडणुकीतही त्याचा प्रत्यय येत आहे.

महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या बरोबरीने शेतकरी संघटनांच्या राजकारणालाही एक महत्त्व आणि स्थान आहे. विशेषत शेतीच्या खुलेकरणाची मागणी घेऊन रस्त्यावर उतरलेले शरद जोशी यांच्यापासून शेतकरी चळवळ वलयांकित बनली. शेतकरी संघटनेची स्थापना करणारे जोशी यांनी स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ‘स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना केली होती. या पक्षाचे ते खासदार होते. जोशी यांच्या मुशीत शेट्टी यांच्यासह अनेकांची जडणघडण झाली. जोशी यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यावर शेट्टी यांनी त्यांच्यापासून फारकत घेऊन स्वतची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली.

आंदोलनातून वाटचाल

शेट्टी यांनी ऊस दर आंदोलनात स्वतची प्रतिमा कृष्णाकाठी निर्माण केली. एका आंदोलनात रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याने त्या लढय़ाच्या सहानुभूतीवर शेट्टी यांनी २००४ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली, तेव्हा त्यांचे चिन्ह होते ‘विमान’. ही निवडणूक त्यांनी स्वबळावर लढवली होती. २००९ साली लोकसभेच्या आखाडय़ात ते उतरले कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या सोबत आघाडी करून. दोघांचेही चिन्ह होते ‘कपबशी’. या निवडणुकीत शेट्टी यांनी डावे, जनता दल यांची सोबत घेतली होती. तर, गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत शेट्टी यांनी भाजपच्या महाआघाडीत प्रवेश करून निवडणूक लढवली. शेट्टी हे भाजप-शिवसेनेच्या सहकार्याने दुसऱ्यांदा संसदेत पोहचले. या वेळी शेट्टी आणि ‘शिट्टी’ असे चिन्हाचे यमकही जुळले होते.  काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून शेट्टी यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे. या वेळी शेट्टी हे नवा मित्रपक्ष आणि बॅट हे नवे चिन्ह घेऊन मदानात उतरणार आहेत.

स्वाभिमानीचे या आधीचे कपबशी, शिट्टी हे चिन्ह उत्तर भारतात अन्य पक्षाकडे गेले असल्याने त्यांना बॅट चिन्हावर समाधान मानावे लागले आहे. मात्र क्रिकेटचा हंगाम सुरू असताना बॅट विशेष लक्षात राहील.  – भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना कोल्हापूर

अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष

निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्षांच्या सूचीवर स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. ज्या पक्षाकडे २ खासदार, १२ आमदार वा एकूण मतांच्या ६ टक्के मते असतील तर त्या पक्ष/संघटनेला कायमस्वरूपी चिन्ह मिळते. स्वाभिमानीकडे एकच खासदार आहे.

First Published on March 15, 2019 1:37 am

Web Title: history of raju shetti