करोना योद्धय़ांचे जागोजागी फलक

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर: राजकारण असो की विकास कामे, कोणत्याही मुद्दय़ावरून कोल्हापूर जिल्ह्यात आजी—माजी पालकमंत्र्यांमध्ये सतत संघर्ष पाहायला मिळतो. कोल्हापुरातील करोना रुग्ण आलेख काहीसा कमी होत चालला असताना करोना योद्धय़ांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उपक्रमातून पालकमंत्री सतेज पाटील व माजी पालकमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील सन्मानाचा अनोखा सामना कोल्हापूरकरांना पाहायला मिळत आहे. या विधायक उपक्रमाच्या स्पर्धेतून करोना योद्धय़ांचे फलक शहरात जागोजागी रातोरात उभारले गेले आहेत.

राजकारण, सहकारी संस्था, कोल्हापूर महापालिका अशा अनेक विषयांवरून आजी – माजी पालकमंत्र्यांमध्ये सातत्याने संघर्ष पाहायला मिळत असतो. आता या दोघातील एका सकारात्मक उपक्रमाची चढाओढ पाहायला दिसत आहे. त्याला निमित्त ठरले आहे करोना योद्धय़ांचा सन्मान. कोल्हापूरमध्ये करोना रुग्ण संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण राज्यात सर्वाधिक होते. त्यावरून भाजपनेही जोरदार टीका केली होती. तर ते आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे महाविकास आघाडीचे मंत्री सांगत राहिले. रोजची रुग्ण संख्या दीड हजाराच्या आसपास असताना या आठवडय़ात ती हजाराच्या आत आली असून चाचण्यांचे प्रमाणही लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा देणारी ही बाब.

दिलासादायक विधायक स्पर्धा

वातावरणात मोकळा श्वास घेतला जात असताना एका विधायक उपक्रमाचा सामना आजी—माजी पालकमंत्र्यांमध्ये दिसत आहे. गेल्या सव्वा दीड वर्षांच्या कालावधीमध्ये करोनामुळे लोक चिंतेत असताना अनेक स्वयंसेवी संस्थांनी तसेच व्यक्तिगतरीत्या शेकडो जणांनी लोकांच्या दु:खाचा वेदनेचा भार कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. सामाजिक कार्य करणाऱ्या करोना योध्यांची पाठ थोपटण्यासाठी आजी—माजी पालकमंत्र्यांनी शहरात मोठमोठे फलक उभारले आहेत. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांचे फलक म्हटले की त्यावर त्यांच्या प्रतिमा ठळकपणे दिसत असतात. पण या वेळी मात्र राजकारण्यांनी फलक उभारले असताना त्यांच्याऐवजी सेवारत सेवारतींची छबी ठळकपणे दिसत आहे. यामुळे या उपक्रमाचे शहरात चांगले स्वागत होत आहे. अशी विधायक स्पर्धा सतत पहायला मिळावी,  अशा भावनाही समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.

श्रेयाची किनार

करोना काळामध्ये संस्थात्मक आणि व्यक्तिगतरीत्या अनेकांनी प्रशासन, कोविड केंद्रांना मदत, रुग्णांना आधार अशा विविध माध्यमातून सेवा कार्य केले. त्यासाठी ‘सलाम कोल्हापूरकर’ हा उपक्रम राबवला आहे. त्यांचे फलक उभे करून सन्मान केला आहे. पुढील संकटकाळातही त्यांनी सेवा कार्य सुरू ठेवावे,’ असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले. माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अभिमान कोल्हापूरचा’ या नावाने फलक उभे केले आहेत. ‘पुणे येथे ही मोहीम सुरू केली होती. आता ती कोल्हापूरमध्ये सुरू करून येथील सेवाकार्याच्या परंपरेला मानवंदना दिली आहे,’ असे म्हणत भाजपने हा उपक्रम आपण आधीच सुरू केला असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. करोना काळात सातत्यपूर्ण लोककल्याणाचे काम करून लोकांना धीर दिला. त्यांना वंदन म्हणून हे अभियान असल्याचे भाजपच्या फलकावर नमूद केले आहे.