दयानंद लिपारे

सर आली धावून, घर गेले वाहून, अशा काव्यात्मक ओवी भावत असल्या तरी महापुराच्या जलप्रलयात कोल्हापूर जिल्ह्यतील हजारो घरे जमीनदोस्त झाली. जलसमाधी मिळालेल्या हजारो घरांवर पुन्हा छत उभे राहण्याची शक्यताच मावळली आहे. अशा घराविना राहणाऱ्या लोकांसाठी घर बांधून देण्याचे आवाहन करताच अवघ्या ३ दिवसात १०० घरे बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करणारे मदतीचे हात पुढे आले आहेत. महापूर काळात मदत व पुनर्वसन कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या केडीएमजी (कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप) या सेवाभावी संस्थांच्या समूहाने गृह बांधणीचे हे काम स्वीकारले असून त्याला प्राथमिक टप्प्यात मिळणारा प्रतिसाद लक्षणीय ठरला आहे.

कोल्हापूर शहराला महापुराचा अभूतपूर्व फटका बसला. त्यामध्ये स्थावर व जंगम स्वरूपाचे अतोनात नुकसान झाले आहे. ४ लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले. हजारो लोकांची घरे महापुरात वाहुन गेली. अशा वेळी शहरातील मदतकार्यात सुसूत्रता आणणे, पूरग्रस्तांसाठी जलदगती साहाय्य उपलब्ध करणे, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद आदींना सहाय्य करणे, पूर ओसरल्यावर काय करावे या विषयावर प्रबोधन करणे, स्वयंसेवी संस्थांमध्ये सुसूत्रता राखून पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहचवणे आदी कामांसाठी केडीएमजी हा मंच स्थापन झाला. पितळी गणपती मंदिरामागे द एम्पायर या इमारतीमध्ये कार्यालय सुरू झाले. मेडिकल असोसिएशन, क्रेडाई, व्हाईट आर्मी, हॉटेल मालक संघ, आयटी असोसिएशन, बच्चन वेडे, उद्योग, केमिस्ट असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स, माणुसकीची भिंत, जिल्हा बार असोसिएशन, स्ट्रक्चरल इंजिनिअरींग असोसिएशन अशा नानाविध संस्था मदतकार्यासाठी एका छताखाली एकवटल्या.

एकीकडे मदत व पुनर्वसन कार्याला हात घातला जात असताना दुसरीकडे स्थायीस्वरूपाचे कार्य उभारण्याचा संकल्प करण्यात आला. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यत किमान १०० घरे नवीन बांधून देण्याचा संकल्प आहे. त्यासाठी नियोजित घराच्या संकुलाची रचना शिरीष बेरी, प्रशांत खाडे, नितीन कदम यांनी केली आहे. या कार्यासाठी निधीची गरज असल्याने समाजमाध्यमातून आवाहन करण्यात आल्यानंतर अतुल परचुरे, गिरिजा ओक अशा चित्रपटसृष्टीतील वलयांकित व्यक्तींसह जर्मनीतील दिग्विजय पाटील, कुलभूषण बिरनाळे, ज्ञानेश्वर माउली आळंदी ट्रस्ट, चिंचवडच्या प्रज्ञानबोधिनी प्रशाला तसेच पुण्यातील कॉर्पोरेट कंपन्यांनी पुण्यातीलच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संघटनेने या कामासोबत राहण्यासाठी प्रतिसाद दिला. मदतीचे हात पुढे आल्याने आणि शेकडो मान्यवर मंडळी या कार्याशी जोडल्याने तिसऱ्याच दिवशी १०० गृह बांधणीसाठी आवश्यक असणारी मदत उपलब्ध झाली आहे.

दर्जेदार घरे

जिल्हा प्रशासनाकडून घरांची गरज कोणाला आहे याचे सव्‍‌र्हेक्षण लवकरच पूर्ण होईल. त्याचा अहवाल आला की प्रशासनाने सूचित केल्याप्रमाणे गृह बांधणी प्रकल्पाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. ही घरे टिकाऊ  व पर्यावरणपूरक असतील याकडे लक्ष दिले जाणार आहे. कु टुंबाच्या सर्वप्रकारच्या गरजा पूर्ण होतील अशी त्याची रचना केली आहे, अशी माहिती डाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर व सचिव रवि माने यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सांगलीतही अनुकरण

केडीएमजी या मंचने कोल्हापुरात केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्याची माध्यम, समाजमाध्यमातही चर्चा आहे. या कामाची  कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलेले आणि आता सांगलीचे जिल्हाधिकारी असलेले अभिजित चौधरी यांनी दखल घेतली आहे. त्यांनी केडीएमजी मंचचे इंद्रजित नागेशकर, युवराज ओसवाल, अभय देशपांडे, संजय शेटे, डॉ. शीतल पाटील, प्रकाश मेहता, संदीप नष्टे, प्रशांत पोकळे, मदन पाटील, सुधर्म वाझे आदींना निमंत्रित करून विद्यमान व भविष्यातील कामाची माहिती घेतली आणि सांगलीतही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केडीएमजीचा कोल्हापूर पॅटर्न राबवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.