कोल्हापूर : अनेक वर्षांपासून बंद असलेले कोल्हापुरातील कामगार विमा रुग्णालय (इएसआय) उद्या मंगळवारपासून सुरू होणार आहे. सुरुवातीला येथे बारुग्ण विभाग सुरू केला जाणार आहे.  नंतर टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रियाही केल्या केल्या  जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा लाख कामगारांच्या पाच लाख कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे,  अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले,  शासकीय विश्रामगृहानजीक विस्तीर्ण जागेत उभारण्यात आलेली या रुग्णालयाची इमारत वापराविना पडून आहे. अनेक वर्षे आंदोलन करूनही या इमारतीचा वापर होत नसल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी होती. गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या कामगार विमा रुग्णालयास आता नवसंजीवनी मिळाली आहे.

आता येथे उद्यापासून बारुग्ण विभाग सुरू केला जाणार आहे. याचे रीतसर उद्घाटन आरोग्य मंत्री, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, या समितीचे प्रमुख खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत लवकरच भव्य समारंभात केले जाणार आहे.  या कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रित केले जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सव्वा लाख कामगार या योजनेचे लाभार्थी आहेत.  त्यांच्या कुटुंबातील पाच लाख लोकांना या रुग्णालयाचा लाभ घेता येणार आहे . अनेक वर्ष दुरवस्थेत असलेले हे रुग्णालय सुरू  होत असल्याचा आनंद वाटतो असेही खासदार महाडिक म्हणाले.

१० कोटींची गरज-डॉ. खेडकर

या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दुष्यंत खेडकर म्हणाले,  या रुग्णालयासाठी ६० डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी सात जणांची निवड करण्यात आली असून ते  सेवेत रुजूही झाले आहेत. भूलशास्त्र,  शस्त्रक्रियागृह, अती दक्षता विभाग याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू केले जाणार आहे.  या कामाकरिता एक कोटी १४  लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील पंचवीस लाख रुपयांचा उर्वरित निधी खर्च झाला आहे. अद्ययावत उपचारासाठी शहरातील स्वस्तिक व मोरया या रुग्णालयांशी  सामंजस्य करार केला आहे.  जुने करार कायम राहणार आहेत. शंभर खाटांचे रुग्णालय पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी दहा कोटी रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर ऋषिकेश पत्की, समीर शेठ उपस्थित होते.