13 December 2019

News Flash

कोल्हापूर महापौरपदाचा कार्यकाळ नेमका किती?

महापौर व उपमहापौर याचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. कोल्हापुरात मात्र तो केवळ कागदावर असतो.

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर महापालिकेच्या आजवरच्या महापौरपदाच्या फलकावर उद्या आणखी एक नाव झळकेल. पण ते किती कालावधीसाठी हे मात्र या पुरोगामी शहराला पुसण्यात अर्थ उरला नाही. एक महिना, तीन महिने किंवा फारतर सहा महिना असा नूतन महापौरांचा कालावधी असेल. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदावरून लोकशाहीची कलंकशोभा आजही कायम आहे.

राज्य शासनाने विकासकामांना गती आणि पदाला स्थिरता यावी व्यापक हेतूने महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षे करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यावर पद्धतशीरपणे बोळा फिरवण्यात कोल्हापुरातील सर्वपक्षीय राजकीय नेते तरबेज बनले आहेत. त्यातूनच ‘महापौरपदाची खांडोळी’ या बदनामीकारक शब्दाची बिरुदावली लागूनही त्याविषयी कोणाला ना खंत ना खेद.

महापौर व उपमहापौर याचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. कोल्हापुरात मात्र तो केवळ कागदावर असतो. उद्या शुक्रवारी नव्या महापौरांची निवड होणार आहे. महापौरपदाच्या फलकावरील हे ४९ वे नाव असेल. कोल्हापूर महानगरपालिकेचा इतिहास उणापुरा ४१ वर्षांचा. कोणाही महापौरांना मुदत पूर्ण करण्याची संधी अभावानेच मिळाली. ज्यांनी मिळवली त्यांनी महापौरपदाची खांडोळी करणाऱ्यांच्या अपेक्षांचा चक्काचूर करून मिळवली. अन्यथा इतरांच्या नशिबी तीन, सहा, बारा महिने अशी किरकोळ खिरापत आली. हे असे का होते? असा प्रश्न महापालिका सांभाळणाऱ्या नेत्यांना विचारला तर सर्व नगरसेवकांना सांभाळण्यासाठी आणि सर्वाना सामान सत्तेचा वाटा मिळावा यासाठी हे करणे भाग आहे, असे उत्तर ऐकायला मिळते.

महाडिक काळात पायंडा

कोल्हापूर महापालिकेची सत्तासूत्रे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे असताना त्यांनी खांडोळीची पद्धत पाडली. सन २००० पासून हे सत्र सुरू झाले. तीन महिन्यांपर्यंत महापौरपदाची विभागणी करून पदाची अवहेलना केली. राज्याभरात हा विषय चेष्टेचा झाला होता. कोल्हापूरच्या स्वाभिमानी, चाणाक्ष लोकांनी हे कसे सहन केले, असा सवालही गेला. सत्कार आणि एखाद् दुसरी सभा पार पडली की महापौर महोदय पायउतार होण्यास स्वत:हून सज्ज असत. जिथे महापौरपदाच्या खुर्चीत बसलेल्यानांच पदाची अप्रतिष्ठा करतो याचे भान नाही तेथे घोडेबाजार भरवलेल्या नेत्यांना निर्णय घेण्याचे मोकळे रान होते. एकेका प्रभागात दोघा – तिघांना रसद पुरवायची, निवडून येईल तो आपला नगरसेवक असा घोडेबाजार रंगण्याचा तो काळ. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना हुकमाचे ताबेदार होण्यावाचून पर्याय उरला नव्हता.

महापौरपदाची चेष्टा

१९७८ साली नारायण धोंडीराम जाधव हे कोल्हापूरचे पहिले महापौर झाले. तेव्हापासून करवीर नगरीत प्रथम नागरिक होण्याचा बहुमान  ४८ नगरसेवक – नगरसेविकांना मिळाला आहे. दशकभरात १४ महापौर याच शहरात झाले. २०१५ पासून आतापर्यंत पाच महापौर बदलले गेले. आता नव्या महापौरांना संधी मिळणार असली तरी ती किती महिन्यांची हे त्यांनाही माहीत नाही असे विलक्षण अभिसरण महापौरपदाचे झाले आहे. कोल्हापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सखारामबापू खराडे यांच्या कन्या सई खराडे यांनी १६ नोव्हेंबर २००५ ते १ मे २००८ अशा अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ताराराणी आघाडीतर्फे कोल्हापूरचे महापौरपद भूषवले. त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. पण पूर्ण कालावधीसाठी महापौरपद मिळावे, यासाठी त्या जनसुराज्यमध्ये जाऊन पद  टिकवण्यात यशस्वी ठरल्या. अशा सोयीच्या आणि धाडसी खेळी सर्वच महापौरांना करता आल्या नाहीत.

पाटील, मुश्रीफ.. मागील पानावरून पुढे

अपक्ष नगरसेवकांची साटमारीचे राजकारण मोडून काढून पक्षीय राजकारणाचा नवा अध्याय गेल्या काही निवडणुकांत दिसून आला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पक्षीय आघाडीचे राजकारण करून महाडिक यांना सत्तेपासून दूर हटवले. पण, महाडिक यांच्या कार्यकाळात बदनाम झालेला खांडोळीचा खेळ मोडून काढण्याची भाषा करणाऱ्या पाटील – मुश्रीफ यांना सत्ता मिळूनही मागील पानावरुन पुढे हाच धडा गिरवावा लागला. त्याला शिवसेनेनेही साथ लाभली. सत्ताबदल होऊनही पदांचा परिपाठ बदलला गेला नाहीच. लाखोंची पुंजी लावून निवडून आणलेल्या नगरसेवकांना पदांची अधिकाधिक संधी देण्याचे सत्र सुरू राहिल्याने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशा मानाच्या पदांची खांडोळी झाली. अशातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महापालिका राजकारणात प्रवेश झाला. भाजप- ताराराणी आघाडी यांनी विरोधकांची भूमिका निभावताना प्रत्येक महापौर निवडीवेळी चमत्कार होण्याची भाषा केल्याने सत्ताधारी नेत्यांवर आपलेच नगरसेवक सांभाळण्याची कसरत करावी लागली.

First Published on November 15, 2019 1:12 am

Web Title: how much is the tenure of kolhapur mayor abn 97
Just Now!
X