लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असतानाच कोल्हापूर जिल्हय़ात सत्तारूढ भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची शोधाशोध करावी लागत आहे. विरोधकही कोणता पर्याय सोयीचा ठरेल याचा आढावा घेत आहेत.

सत्तेत आल्यापासून भाजपने एकापाठोपाठ निवडणुकांत यशाची कमान उंचावली असली तरी यंदा होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीच्या पातळीवर उत्साहवर्धक चित्र नाही. पक्षाकडे अनेक सक्षम उमेदवाराची पलटण असल्याचा दावा असला तरी कोल्हापुरात मुख्य भिस्त आहे ती राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक. तर, हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टीविरोधात कोण याची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीला महाडिकांनी आणि शिवसेनेला संजय पाटील यांनी पक्षाकडून उमेदवारी घ्यायचे टाळले तर काय करायचे याची चिंता आहेच.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपने केंद्रातील सत्ता मिळवली. त्यानंतर जवळपास प्रत्येक निवडणुकीत भाजपने यश प्राप्त केले. सत्तासंचालन करत असतानाच निवडणूक तंत्रावरही भाजप चांगलाच स्वार  झाला. कोल्हापूर जिल्हा या यशाला अपवाद राहिला नाही. कोल्हापूर महापालिका वगळता नगरपालिका ,जिल्हा परिषद, ग्राम पंचायत पासून ते सहकार क्षेत्रातील निवडणुकीत भाजपाचा आलेख उंचावत राहिला. निवडणुकीची पक्की बांधणी करणारा भाजप लोकसभा निवडणुकीबाबत पुरेशा तयारीत असल्याचे जाणवत नाही. जिल्ह्य़ातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात हे दिसून येते. ‘आयाराम’ उमेदवारांवर भाजपाची भिस्त राहणार का, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यासमोरही तगडा उमेदवार मिळवण्याचे आव्हान आहे.

शेट्टींविरोधात चाचपणी

हातकणंगले हा मतदारसंघ वाटपानुसार शिवसेनेकडे गेलेला. गतवेळी महाआघाडीत समाविष्ट झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यासाठी हा सोडला होता. शेट्टी यांनी प्रथमच सत्तासंगतीची फायदे-तोटे अनुभवले आहे. सत्ताकारणामुळे संघटनेतील फुटीचा कटू अनुभवही त्यांनी अनुभवला आहे. सदाभाऊ  खोत यांच्यासारखा सोबती सत्तेच्या वळचणीला गेल्याने शेट्टी यांना एकाकी स्वाभिमानीची नांगरट करावी लागत आहे. हल्ली शेट्टी यांनी भाजपाविरोधात मुख्यत्वेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे . तुलनेने त्यांची शिवसेना – उभय काँग्रेसशी जवळीक  आहे . हा बदल लक्षात घेऊन भाजपने शेट्टी यांना संसदेतून शिवारात पाठवण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी उमेदवाराची शोधाशोध सुरू असली तरी कोणाएका नावावर एकमत होताना दिसत नाही. शेट्टी यांचे एके काळचे जिवलग मित्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत, जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री विनय कोरे, पक्षाचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे शिरोळचे आमदार उल्हास पाटील अशा बडय़ा असामींची राजकीय कुंडली भिंगाखालून तपासून घेतली जात आहे. मात्र यापैकी कोणाचेच अधिकचे गुण जमत नसल्याने सर्जनशील लेखक आणि परराष्ट्र मंत्रालयातले सचिव ज्ञानेश्वर मुळे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील अशा अधिकाऱ्यांची चाचपणीही केली जात आहे, पण अजूनही आखाडय़ात कोणाला उतरवायचे याबाबतच्या नावाची निश्चिती होताना दिसत नाही. शेट्टी यांच्याशी राजकीय सोयरीक जमली नाही तर उभय काँग्रेसपुढे उमेदवार निवडीची डोकेदुखी आहे. शिवाय, हा मतदारसंघ कोणाच्या गळ्यात मारायचा यावर त्यांच्यातच डावपेच रंगातील. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मतदारसंघ गतवेळी काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासाठी सोडला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीपासून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे शेट्टी यांच्याशी सूत जुळले आहे. यामुळे काँग्रेसच्या छावणीत शांतता आहे. राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी पुत्र, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली आहे. शरद पवार यांना भेटून उमेदवारीही मागितली आहे. पक्षाकडून कोणीही यावर भाष्य केलेले नसल्याने हे प्रकरण अधांतरी आहे. मुंबई मोर्चाच्या निमित्ताने शेट्टी – शिवसेना यांच्यात मधुर संबंध निर्माण झाले आहेत. त्यामळे शिवसेना त्यांच्या विरोधात उमेदवार देणार का, द्यायचा तर धनुष्यबाण कोणाच्या खांद्यावर ठेवायचे हा मुद्दा सेनेला सतावणारा आहे.

उमेदवारीवरून भाजपमध्ये संभ्रम

भाजप – शिवसेना युती सूत्रानुसार कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. अलीकडे शिवसेनेने भाजपवर सातत्याने निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. पुढील निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेल, असे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. तसे झाल्यास कोल्हापूरसाठी भाजपला उमेदवार शोधावा लागेल. आजच्या घडीला भाजपकडे तगडे नाव दिसत नाही. गतवेळी सेनेचे संजय मंडलिक यांना पराभूत करून धनंजय महाडिक यांनी संसद गाठली. तेव्हापासून महाडिक यांचे भाजपशी विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सलगी वाढली आहे. पालकमंत्री पाटील यांनी तर महाडिक हे केंद्रातील मंत्री बनतील, असे सांगून पक्षाकडून लढण्याची खुली ऑफर केली होती. त्यामुळे महाडिक हेच भाजपचे उमेदवार असतील असे कार्यकर्ते गृहीत धरून आहेत. भाजप कोल्हापूर महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी कर्नाटकातील भाजपचे यश पाहता महाडिक हे भाजपकडून लढतील असा विश्वास ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला आहे. पण, महाडिक नसतील तर उमेदवार कोण हा प्रश्न भाजपाला सतावणारा आहे. महाडिक यांचा कल कोणाकडे राहणार याचा पत्ता अद्याप उलगडला गेला नाही. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्य़ातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व नेत्यांविषयी आदर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वजण मला मदत करतील,’ असे विधान करून महाडिक यांनी पक्षाशी जुळवून घेतल्याचे संकेत दिले आहेत. महाडिक परिवार सत्तेच्या बाजूने राहणारा आहे. वारे भाजपच्या बाजूने वाहते आहे असे दिसताच महाडिकांचे चिन्ह कमळ असेल. असे झाल्यास काय करायचे याचा पेच राष्ट्रवादीसमोर आहे. दुसरा सक्षम उमेदवार पक्षाकडे दिसत नाही. मुश्रीफ यांचे नाव पुढे येत असले तरी त्यांना विधानसभाच खुणावत आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे. अलीकडे मंडलिक, मुश्रीफ, सतेज पाटील या त्रयीने अनेकदा एकाच मंचावरून महाडिक यांना लक्ष्य केले आहे. पूर्वाश्रमी राष्ट्रवादीत असलेले मंडलिक यांनीही सेनेपासून बाजूला जाण्याचा इरादा व्यक्त केला नसला तरी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगून टाकले आहे. महाडिक कोणत्या पक्षाकडून लढणार हे स्पष्ट झाल्यानंतरच इतर पक्षांना उमेदवार निश्चित करावा लागणार आहे.