राज्याचा उद्योगमंत्री मीच असल्याने मुंबईत होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमास कोणाला निमंत्रित करायचे हे मीच ठरविणार असल्याचे सांगत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या  कार्यक्रमास उध्दव ठाकरे यांना निमंत्रित करणार असल्याचे संकेत येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
फेब्रुवारी महिन्यात १३ ते १८ या कालावधीत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई हे हा सप्ताह यशस्वी व्हावा यासाठी राज्यभरातील उद्योजकांशी संवाद साधत आहेत. या अंतर्गत देसाई यांनी आज करवीर नगरीतील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यानंतर पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने घेतलेल्या धोरणाची माहिती दिली. ते म्हणाले, या विभागाने ४२ नवीन शासन आदेश काढले असून उद्योग वृध्दीसाठी गतीने प्रयत्न सुरू आहेत. मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय अधिकारी आणि कर्मचारी राबवत नसल्याचे उद्योग विभागाच्या निदर्शनास आले असल्याने त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यात पुणे, मुंबईच्या धर्तीवर मोठे उद्योग आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्यात उद्योगधंद्यासाठी सवलतीच्या दरात वीज देण्यात येत आहे याकडे लक्ष वेधले असता देसाई यांनी वीज दरवाढ ही मोठी समस्या असल्याने सरकारच्या वतीने मार्ग काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत १९ जानेवारी रोजी बठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमापासून उध्दव ठाकरे यांना दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता देसाई यांनी या कार्यक्रमाचा मी निमंत्रक आहे. राज्याचा उद्योगमंत्रीही मीच आहे. त्यामुळे त्याचे निमंत्रण कोणाला द्यायचे हेही मीच ठरविणार आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांना निमंत्रित करण्याचा मनोदय व्यक्त केला.