28 February 2021

News Flash

इचलकरंजी पालिकेला महापालिका होण्याचे वेध

राज्याचे मँचेस्टर अशी इचलकरंजी शहराची ओळख आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा असे सूचित करताना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्य़ातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव द्यावा असेही सांगून टाकले. यामुळे इचलकरंजी आणखी मोठी झाल्याचे स्वप्न पाहणाऱ्या मंडळींना आनंद झाला नसता तर नवल. महापालिका झाल्यानंतर महापौरपद मिळवण्याचे स्वप्नही काहींना पडू लागले आहे. मात्र नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्यानंतर शहराच्या विकासाचा नेमका कोणता गुणात्मक आणि आर्थिक विकास होणार आहे याचा कसलाही विचार केलेला नाही. याचा कसलाही प्रस्ताव नसताना केवळ महापालिका महापालिका या मोठय़ा नावाचे आकर्षण असून या प्रस्तावाच्या कच्छपी लागल्याचे चित्र आहे.

राज्याचे मँचेस्टर अशी इचलकरंजी शहराची ओळख आहे. यंत्रमागाचे हे शहर २४ तास जागे असते. उद्योग आणि निवास हे यांची सरमिसळ येथे गल्लोगल्ली पाहायला मिळते. या शहराचा गेल्या ३०-४० वर्षांत मोठा विकास झाला. इतका की आजूबाजूच्या खेडेगावांच्या सीमांपर्यंत इचलकरंजी विस्तारले गेले. याच काळात मोठय़ा वास्तू, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, प्रशस्त क्रीडांगण, शाळांच्या आकर्षक इमारती असे बरेच काही भव्यदिव्य म्हणता येईल असे घडून गेले. नवे सहस्रक सुरू झाल्यापासून इचलकरंजी नगरपालिकेची नवीन इमारत, संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रकल्प वगळता नजरेत भरावी अशी एकही वास्तू नगरपालिकेच्या माध्यमातून उभी राहिली नाही. जकातीचे अनुदान बंद झाल्यापासून राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानावरच नगरपालिकेची आर्थिक भिस्त आहे. गरीब- श्रमिकांचे शहर असा मुद्दा करीत दरवेळी घरफाळा, पाणीपट्टी वाढ हाणून पाडली जाते. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातही भर पडलेली नाही. एकूणच नगरपालिकेची अर्थकोंडी होताना दिसत आहे. श्रीमंतीचा तोरा उतरलेल्या नगरपालिकेला आता महानगरपालिका होण्याची मोहिनी पडली आहे. नगर विकासमंत्री शिंदे यांनी महापालिकेचा प्रस्ताव देण्याचे सूचित केल्याने या स्वप्नाला नवी दिशा मिळत चालली आहे. या स्वप्नांच्या मागे लागताना आपली दशा आणि दिशा बदलणार आहे का, याचा मात्र मुळातून विचार करण्याची तसदी फारसे कोणी घेताना दिसत नाही.

पुढच्यास ठेच..

इचलकरंजी शहराने महापालिका होताना आपल्याच जिल्ह्य़ाचे शहर असलेल्या कोल्हापूरचा विचार करणे अधिक सयुक्तिक ठरणारे आहे. कोल्हापूरकर चार दशके संघर्ष करत असूनही तसूभरही हद्दवाढ झालेली नाही. हीच परिस्थिती इचलकरंजीकर यांच्या वाटय़ाला उद्या महापालिका झाल्यावर येऊ शकते.

इचलकरंजी शेजारच्या कबनूर गावाने नगरपालिका होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्या कोरोचीमध्येही हेच घडू शकते. चंदुर, खोतवाडी, तारदाळ या आजूबाजूच्या गावांचाही संभाव्य महापालिका हद्दीत येण्यास विरोध आहे. आरक्षणाच्या नावावर ग्रामीण भागातील भूखंड हडप करण्याचे नगरपालिकेतील चाणाक्ष नगरसेवकांचे डावपेच ग्रामीण भागातील जनता ओळखून आहे. त्यामुळे या कावेबाजपणाला ग्रामीण जनता बळी न पडता महापालिकेपासून दूर राहणे श्रेयस्कर मानू शकते. नगरपालिका कारभारातील सावळा गोंधळ उघडय़ा डोळ्यांनी पाहत असणारी जनता स्वत:हून खड्डय़ात उडी मारण्याची शक्यता कमीच. नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्याचा नेमका काय फायदा होणार याचे उत्तर कोणाकडे नाही. यामुळे नेमका कोणता गुणात्मक आणि आर्थिक विकास होणार आहे याचे बेधुंद कारभार असलेल्या नगरपालिकेकडे कोणतेच उत्तर अद्याप तरी नाही. केवळ महापालिका नावाच्या स्वप्नांनी त्यांना साद घातली असल्याचे दिसत आहे.

एक स्वप्न

* शहरांमध्ये राज्यांमध्ये ‘ड’वर्गाच्या १६ महापालिका असून यातील बहुतेक महापालिकांची आर्थिक स्थिती यथातथाच राहिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने लातूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले.

* पण या महापालिकेला यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राचे पैसे देण्याचीही आर्थिक क्षमता राहिली नाही. येथे कित्येक दिवस पाणी येत नाही. शेजारच्या सांगली महापालिकेची अवस्थाही बिकट आहे.

* तेथील कामाचा घसरलेला दर्जा, खाबुगिरी, अनियंत्रित कारभार यामुळे शहर विकास पासून दूर गेल्याची टीका होत असते.

* कोल्हापूर शहरात गेल्या ४० वर्षांंत हद्दवाढ झालेली नसल्याने कोल्हापूर शहर कुंठीतावस्थेत सापडलेले आहे. विकासाच्या मर्यादा कोल्हापूरकरांना स्पष्टपणे दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:16 am

Web Title: ichalkaranji corporation to become a municipal corporation abn 97
Next Stories
1 पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी
2 कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावावरून वाद
3 हुतात्मा दिन कार्यक्रमाला निघालेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलिसांनी रोखले 
Just Now!
X