इचलकरंजी येथे तांबे मळा परिसरातील काँग्रेसचे उमेदवार बंडोपंत लाड व ताराराणी पक्षाचे राजवर्धन नाईक यांच्यात वादावादी होऊन लाड यांच्या घरावर मंगळवारी दगडफेक झाली. या प्रकरणी या दोन्ही उमेदवारांच्या परस्परविरोधी तक्रारींची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात नगरसेवक जयवंत लायकर व अमर जाधव यांच्यात असा प्रसंग उद्भवला होता.

इचलकरंजी शहरामध्ये निवडणुकीची धामधूम चालू झाली आहे.  काँग्रेसचे उमेदवार बंडोपंत लाड हे प्रभाग २९ ब मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभागात प्रचारासाठी केले होते. ताराराणी आघाडीचे उमेदवार त्या प्रभागात प्रचारासाठी गेले असता तेथे लाड यांचा कार्यकर्ता नितीन कांबळे यांना नाईक यांनी कुडचे मळा येथे प्रचार करायचा नाही सांगितले. यावरून दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले. हा प्रकार कुडचे मळ्यात मिटला. त्यानंतर यांच्या कार्यकर्त्यांनी लाड यांच्या घरावर दगडफेक केली. घराच्या काचा फोडल्या. त्यानंतर लाड व नाईक यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होऊन शिवीगाळ व दमदाटी केली. त्या ठिकाणी संभाजी नाईक, धनाजी नाईक, राजवर्धन नाईक, सागर चाळके, घुनके जॉबर व सात ते आठ कार्यकत्यांनी लाड कुटुंबीयांना मारहाण करून या सर्वाना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे लाड यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी बंडोपंत लाड यांनी वरील सर्वाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर शिवानंद घुनके व रेणुका मांगले या दोघांनी बंडोपंत लाड, माया लाड व छाया लाड, सुरेश लाड, विजय लाड यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण व धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. ही घटना तांबे माळ भागात घडल्यानंतर या भागामध्ये तणाव निर्माण झाला होता.