बेळगांव, निपाणीसह सीमाभागातील मराठी बांधवांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत काळा दिवस साजरा केला. हजारो मराठी भाषकांनी मिरवणुकीत सहभाग घेत आपल्या मराठी अस्मितेचे दणदणीत दर्शन घडविले. मिरवणुकीतील हजारो लोकांचा प्रतिसाद पाहता ती ‘न भूतो..न भविष्यती’ असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या सहभागाने मराठी भाषकांना ऊर्जा मिळाली. मात्र, सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे राहील, असा सदासर्वदा उच्चार करणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने मराठी भाषकांनी नाराजी व्यक्त केली.
१ नोव्हेंबर रोजी मराठी भाषकांचा भूभाग कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्यात आला, तेंव्हापासून गेली ६० वष्रे बेळगांव, निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषकांनी १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. मराठी अस्मितेचा लढा आजही जोमाने सुरु असल्याचा प्रत्यय रविवारी निघालेल्या मिरवणुकीद्वारा दिसून आला.
संभाजी चौक येथून सकाळी दहा वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. तानाजी गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर मंदिर, शहापूर, टिळकवाडी माग्रे निघालेल्या मिरवणुकीची सांगता मराठा मंदिर येथे दुपारी एक वाजता झाली. मिरवणुकीत अग्रस्थानी पायी चालत जाणारे मराठी भाषक, त्यामागे सायकलस्वार आणि शेवटी दुचाकीस्वार अशा पध्दतीने मिरवणूक निघाली. तीस हजाराहून अधिक मराठी भाषक एकवटल्याचे चित्र बऱ्याच कालावधीनंतर दिसले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील, शहर अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी नेतृत्व केले. तर खानापूर येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व एकीकरण समितीचे आमदार अरिवद पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी केले.
हजारो मराठी भाषकांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेत आपल्या अस्मितेचे दर्शन घडविले. युवक, महिला, पुरुष असे सर्वचजण इतक्या मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरल्याचे पाहून कन्नडीगांनाही धक्का बसला. मराठी माणसांनी आपला मराठी बाणा ताकदीने दाखवून निर्लज्ज कर्नाटक शासनाला धडा शिकवला असल्याचा सूर मिरवणुकीत सहभागी झालेल्या जवळपास प्रत्येकाकडून व्यक्त होत होता. कर्नाटक शासनाविरुध्दच्या यल्गारामध्ये मराठी भाषकांची तिसरी, तर काही कुटुंबातील चौथी पिढी पहिल्या पिढीइतक्याच उत्साहाने सहभागी झाल्याने आंदोलनाला वेगळे परिमाण लाभले.