इचलकरंजी शहराच्या नळपाणी योजनेला गुरुवारी नवा वळसा मिळाला. साडे तीन लाख लोकसंखेच्या या शहराला आता सूळकुड (ता. कागल) येथे बंधारा बांधून त्यातून १ टीएमसी पाणी देण्याच्या निर्णयावर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या संदर्भात ३१ जुलैपर्यंत जीवन प्राधिकरण विभागाने सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वारणा नदीवरून इचलकरंजी शहराला पाणी न देण्याचा निर्णय दानोळीच्या ग्रामस्थांनी घेतल्याने इचलकरंजीचा नळपाणी प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित पडला होता. तो सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रशासन अधिकारी नितीन देसाई, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जीवन प्राधिकरणचे श्री. महाजन, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक मदन कारंडे, अजित जाधव, सागर चाळके, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, संजय कांबळे सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी, “दानोळी योजना रद्द करून सूळकुड योजना सुरु करू. इचलकरंजी नगरपालिकेचे २५ टक्के आणि शासनाचा ७५ टक्के वाटा यामध्ये असेल. त्यासाठी २५ टक्के तरतूद केली आहे. आणखी ५० टक्के तरतूद राज्य सरकार करेल” असं आश्वासन दिलं.