दारू पिऊन घरात त्रास देणाऱ्या पतीचा आपल्या जावयाच्या मदतीने खून केल्याबद्दल पत्नीसह जावयाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
कमल जालिंदर साबळे (४८) व अशोक मलका आतकरे (३०) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे मृत जालिंदर शंकर साबळे (५०) यांच्या घरात १० मार्च २०१० रोजी खुनाचा प्रकार घडला. जालिंदर यास दारूचे व्यसन होते. त्याचा थोरला मुलगा अरुण साबळे हा इचलकरंजी येथे आपल्या कुटुंबासह राहतो. तर दुसरा मुलगा कराड तालुक्यातील सुपणे येथे गुराळघरावर कुटुंबासह काम करतो. जालिंदरची मुलगी विवाहित असून तिचे सासर नरखेड येथेच आहे. जालिंदर हा दारू पिऊन सतत घरात त्रास देत असल्यामुळे पत्नी कमल ही वैतागली होती. त्यातूनच तिने पतीचा काटा काढण्याचे ठरविले. त्यासाठी जावई अशोक आतकरे याची मदत घेतली. रात्री उशिरा पती जालिंदर हा घरासमोर अंगणात झोपला असता पत्नी कमल व जावई अशोक यांनी त्याच्या गळ्यावर ऊसतोडीच्या कोयत्याने मारून खून केला. यात जालिंदरच्या मानेचा एक चतुर्थाश भाग कापला गेला होता. ही घटना शेजारच्या मंगल बापू पवार या महिलेने पाहिली होती. परंतु तिने जीवे ठार मारण्याच्या भीतीने पोलिसात ही घटना उशिरा सांगितली. तसेच मृत जालिंदरचा मुलगा अरुण हा दुसऱ्या दिवशी इचलकरंजी येथून आल्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्यासमोर झाली. यात सरकारतर्फे नीलेश जोशी यांनी सात साक्षीदार तपासले. यात नेत्रसाक्षीदार मंगल पवार हिची साक्ष महत्त्वाची ठरली. नेत्र साक्षीदार म्हणून तिचा जबाब उशिरा नोंदविण्यात आला असला, तरी खटल्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. तिचा जबाब फेटाळता येणार नाही. तसेच आरोपी कमल हिच्यासोबत घरात असताना जालिंदरचा मृत्यू झाला. आरोपींनीच पोलिसांत विनाविलंब माहिती कळविली नाही. त्यामुळे आरोपींनीच हा गुन्हा जाणीवपूर्वक केल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद अॅड. जोशी यांनी केला. तर आरोपींतर्फे अॅड. अजमोद्दीन शेख यांनी बचाव केला.