करोना विषाणू संसर्गाने कोल्हापूर जिल्ह्यातील विळखा आणखी घट्ट केला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळते. तर इचलकरंजीमध्ये एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या २६ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत चालला आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ४७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील राजोपाध्ये नगरात एक तर शहरानजीक असलेल्या गांधीनगर या व्यापारी शहरात चार, इचलकरंजीतील लाखेनगरमध्ये एक एक रुग्ण आढळला. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दोन, गडहिंग्लज तालुक्यात हलकर्णी, कौलगे, गडहिंग्लज येथे प्रत्येकी एक तर हेब्बाळ येथे दोन रुग्ण आढळले. तारदाळ या हातकणंगले तालुक्यातील गावात एक रुग्ण आढळला.

टाळेबंदीबाबत संभ्रम वाढीस

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच दोन प्रमुख मंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे गोंधळात भर पडली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी टाळेबंदी कडक करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याऐवजी लोकांनी प्रतिबंधक उपाय योजनांची योग्यपणे अंमलबजावणी करावी, असे मत व्यक्त केले आहे. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टाळेबंदी लागू करण्यात येणार नाही, असे थेट विधान केले नाही. या ऐवजी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व सतेज पाटील चर्चा झाल्यानंतर टाळेबंदी जाहीर करण्याबद्दल निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे कोल्हापुरात टाळेबंदी जाहीर होण्याबद्दल आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे.