कोल्हापूर : परिचारिका बदल्या, मंदिर उघडण्यास परवानगी या याप्रश्नी निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजप पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यात शुक्रवारी खडाजंगी उडाली. उपस्थितांच्या गर्दीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावल्यानंतर वाद निर्माण झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना स्थिती गंभीर असताना जिल्हा रुग्णालय असणाऱ्या सीपीआरमधील परिचारिकांच्या बदलीचे प्रयत्न सुरू आहेत. ते रद्द करण्यात यावेत, मंदिरे सुरू करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी भाजपचे महानगराध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र निवेदन देण्यासाठी पाच व्यक्तींनी कार्यालयात यावे अशी अट घालत रेखावार यांनी गर्दी केल्याबद्दल सुनावले. याच वेळी त्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकारांचे कॅमेरे जप्त करण्याचे आदेश दिल्याने वादात भर पडली.

यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाहेर येऊन जिल्हाधिकारी रेखावर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शवली. पण भाजपच्या कार्यकर्त्यांचा ‘हे कोल्हापूर आहे. इथे असे वागणे चालणार नाही. मंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करू नका,’ असा आरोप केला. त्यामुळे जिल्हाधिकारी हात जोडून निवेदन न स्वीकारताच कार्यालयात परतले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवत सुरु ठेवली. निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या भिंतीवर चिकटवली. तर छायाचित्रकारांचे कॅमेरे काढून घेण्याच्य जिल्हाधिकारी रेखावार यांच्या आदेशाबद्दल कोल्हापुरातील पत्रकारांनी निषेध नोंदवला.