कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर करोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी ६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या सहाशेच्या पलीकडे पोहचली असून जिल्ह्यात ६१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल रात्री उशिरा एका करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला.

आज सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. हा दिलासा वाटत असताना सायंकाळी चाचणी अहवाल सूत्रांनी जाहीर केला. त्यानुसार शाहूवाडी तालुक्यातील दोन, करवीर व आजरा येथील प्रत्येकी एक तर शहरातील दोघांचा समावेश आहे. त्यात चार महिला, दोन पुरुष व एका शालेय मुलीचा समावेश आहे.

काल रात्री लाळगेवाडी या शाहूवाडी तालुक्यातील गावातील एका ५५ वर्षीय महिलेचा करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या ६ झाली आहे. यामुळे आरोग्य विभागाने सतर्क होऊन उपाय योजना सुरु केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अन्य जिल्ह्यातून लोकांना पुन्हा प्रवेश दिला जात आहे. त्यांची करोनाचाचणी केली जात आहे. आज सुमारे दीड हजार लोकांची चाचणी करण्यात आली. त्यातून आणखी काही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यामध्ये करोनामुक्त होणारी रुग्ण संख्याही वाढत आहे. तर एकूण १३४ लोक करोनामुक्त झाले आहेत.