03 June 2020

News Flash

कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये पर्यावरण संवर्धनाचा वसा जपत सिद्धांत आणि गायत्री विवाहबद्ध

लग्नखर्च टाळून प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या रोपवाटिकेला दिली मदत

कोल्हापूर : लॉकडाउनच्या काळात पर्यावरणाचं भान जपत सिद्धांत आणि गायत्री हे दोघे लग्नबंधनात अडकले.

लॉकडाउनच्या काळात लग्न करायला परवानगी घेऊन अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पण पूर्णपणे पर्यावरणस्नेही वातावरणात सिद्धांत आणि गायत्री हे दोघे विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे लग्नखर्च टाळून तो निधी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी देऊ केला.

सिद्धांत नारायण मोरे (बुडके) (रा. फुलेवाडी) आणि गायत्री गणेश साळोखे यांचा विवाह लॉकडाउनपूर्वीच निश्चित झाला होता. मात्र, आता लॉकडाउन संपल्यानंतरही लग्नासाठी रजा मिळणार नाही हा विचार करून विवाह याचं काळात उरकण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत पर्यावरणस्नेही वातावरणात लग्नविधी आणि कार्यक्रम आटोपायचा निश्चय त्यांनी केला.

त्यानुसार, आंब्याची डहाळी तोडण्याऐवजी आंब्याचे रोप लावून लग्नाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली तर फटाके, अक्षता आणि इतर खर्च कमी करून दहा हजार रुपयांचा निधी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कोल्हापूरमधील निसर्गमित्र या संस्थेकडे देण्याचे ठरवले. या निधीचा उपयोगही सध्याच्या काळात गरजेच्या असलेल्या महत्वाच्या कामासाठी केला जाणार आहे. या निधीतून प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आवळा, लिंबू, तूती, कढीपत्ता, शेवगा, गुळवेल, अडुळसा, गवती चहा, गोकर्ण, तुळस, हळद, आले, शेंद्री, वेखंड, फॅशन फ्रुट इत्यादी विविध वनस्पतींची रोपवाटिका तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे.

ही रोपं पाहुणे, हितचिंतक, नातेवाईक आणि निसर्गप्रेमींना दत्तक देण्यात येणार आहेत. म्हणून हा निधी निसर्गमित्रचे कार्यवाह अनिल चौगुले, पराग केमकर, अभय कोटणीस यांच्याकडे सुपूर्द करीत एक नवा पायंडा लॉकडाउनच्या काळात या नवदाम्पत्याने पाडला. या अनोख्या प्रयत्नासाठी त्याचे सर्वांनीच कौतुक केले. तसेच लॉकडाउनच्या काळात मामांच्या घरी केलेल्या लग्नाची आठवण रहावी, यासाठी त्याठिकाणी खाद्यरंग देणारे शेंद्रीचे झाड लावले व पाहुणे मंडळींना रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या रोपांचे वाटप देखील केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 3:02 pm

Web Title: in the lockdown gayatri married to siddhant at kolhapur the conservationist of environmental conservation aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोल्हापूरमध्ये ‘लॉजिस्टिक पार्क’ सुरू करणार – सुभाष देसाई
2 कोल्हापूरात आयटी पार्कसाठी हालचाली, प्रस्तावित आराखडा तयार
3 कोल्हापूर : संस्थात्मक विलगीकरण कक्षातील तरुणाकडून तरुणीचा विनयभंग
Just Now!
X