१० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. प्रताप महादेव चव्हाण (वय-३५) असे या अधिकार्‍याचे नाव असून ते प्राप्तीकर विभागात निरीक्षक वर्ग दोन या पदावर कार्यरत आहेत.

याबाबत एका डॉक्टरांनी तक्रार केली होती. डॉक्टरांनी सन २०१२ पासून प्राप्तिकर भरला नव्हता. छापा न टाकण्यासाठी चव्हाण यांनी त्यांच्याकडे वीस लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यावर १४ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार त्यातील दहा लाख रुपयांची रक्कम आज लक्ष्मीपुरी येथील विल्सन पुलावरील रस्त्यावर ही रक्कम स्वीकारत असताना चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. अशी माहिती या विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.