कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. शुR वारी पथकाने मुश्रीफ यांच्या खासगी मालकीच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यात माहिती घेण्याचे काम चालवले होते.

आमदार मुश्रीफ यांच्या कागल, पुणे, कोल्हापूर येथील निवासस्थान, दोन साखर कारखान्यांवर प्राप्तिकर विभागाने काल छापासत्र सुरु केले. काल दिवसभर  कागल निवासस्थान कारवाईचे मुख्य केंद्र होते. येथील तपासणीचे काम रात्री अकरा वाजता संपले. त्यानंतर या पथकाने आज घोरपडे साखर कारखान्याकडे मोर्चा वळवला. कारखान्याचे सभासद, त्यांच्याकडून जमा रक्कम, ताळेबदातील रक्कम, हिशोब याची सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू होते. अशाप्रकारची ही दुसरी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईत त्यांना हवं ते सहकार्य करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. पंधरा तासांच्या या छापेसत्रात अधिकाऱ्यांनी कोणताही त्रास दिलेला नाही. परंतु पत्नी, सुना, मुले आणि नातवंडे यांच्यासाठी दिवसभर बंदिस्त राहणं हे तणावाचे होत आहे.